शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात पुराचा हाहाकार सुरु आहे, अनेक भागांत पूरस्थिती उद्धभवी आहे, पण मुख्यमंत्री मात्र दिल्लीत आहेत. तसेच, अमित शाह यांचा आमच्यावरही दबाव आहे आणि दबावाला बळी पडून ज्यांना जायचं आहे ते जात आहेत, असा खळबळजनक दावाही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
महाराष्ट्रातील काही खासदारांच्या घरांवर चौकी पहारे लागले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त अचानक काही खासदारांच्या घरांवर लावण्यात आला आहे. पोलीस बळाचा, केंद्रीय यंत्रणा, पैशांचा वापर केला जात आहे. ब्लॅकमेलिंगही होत आहे. पण ठिक आहे. जे होईल ते पाहून घेऊ. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करायला, सामना करायला, लढा द्यायला बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तयार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील, तर त्यांची रुटीन व्हिजीट आहे. कारण ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे हायकमांड इकडे आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीत यावं लागतं, असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
( हेही वाचा: मंत्रालयात आता पाण्याची बाटली घेऊन जाता नेता येणार नाही; नव्या सरकारने घातली बंदी )
आम्ही संघर्षासाठी तयार
लढाई कोणतीही असू द्यात. चिन्हाची, पक्षाची कोणतीही. मी तुम्हाला सांगतो की, कोणत्याही लढाईशी दोन हात करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. मी कालही आपल्याला सांगितले. महाराष्ट्र्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे भाजपचे नेतेच सांगतात. अखंड महाराष्ट्र तोडायचा, असं आम्ही नाही, तर भाजपचे नेते सांगतात. महाराष्ट्र फोडायचा असेल, तर शिवसेनेची ताकद कमी करायची, शिवसेनेचे तुकडे करायचे. पण शिवसेनेच्या चिन्हावर, ताकदीवर निवडून आलेले आमदार, खासदार आज जरी पाठीत खंजीर खुपसून जात असले, तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. शिवसेना या सगळ्यातून उभी राहील, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community