शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिवसेनेत भूकंप आला आहे. शिवसेनेतील या भुकंपानंतर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना, आपली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, हे खरं आहे की काही आमदारांशी आमचा संपर्क झाला नाही. काही आमदारांना गुजरातमध्ये नेण्यात आले आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. कडवट शिवसैनिक आहेत. त्यांची बाळासाहेब ठाकरेंवर निष्ठा आहे. ते कुठे जाणार नाहीत. काही नाराजी नक्की आहे, बोलून दूर करता येईल असे राऊत म्हणाले.
( हेही वाचा: धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा यांना अटक )
सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न
मीडियातून जसे चित्र निर्माण केले जात आहे, तसे काही भूकंप वगैरे नाही. नक्कीच काही गोष्टी संशयास्पद आहेत. त्याबाबत वर्षावर सर्वांची बैठक होत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून सर्व आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. महाराष्ट्रात राजस्थान आणि मध्य प्रदेश सारख पॅटर्न राबवून सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण भाजपला महाराष्ट्र अशा प्रकारे अस्थिर करता येणार नाही.
संपर्क झाला तर आमदार परत येतील
शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी स्वत:ला विकणारी औलाद महाराष्ट्रात निर्माण होणार नाही. जे बाहेर पडले त्यांची अवस्था आपण पाहतोय. अनेक आमदार आता वर्षावर आहेत. अनेक नावे आम्ही पाहतोय. जे आमदार इथे नाहीत ते सांगतात की, आम्हाला काय झालं आहे तेच कळत नाही. हे आमदार गुजरातमध्ये, सुरतमध्ये आहेत. त्या आमदारांची व्यवस्था भाजप नेते आर.सी. पाटील करत आहे. सुरतलाच का नेलं ज्या क्षणी आमचा संपर्क होईल त्या क्षणी ते परत येतील, असेही ते म्हणाले.