आम्ही हे खपवून घेणार नाही, आदेशाची वाट पाहतोय! शिवसेनेचा नेता कोणावर आहे नाराज?

173

सध्या महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक वाद शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाढत आहेत. कारण सरकारमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढले आहे. ज्या शिवसेनेमुळे दोन्ही काँग्रेस सत्तेत आल्या, त्याच सेनेवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते त्यांच्यामधील संताप शिवसंपर्क मोहिमेत व्यक्त करत आहेत. स्वतः शिवसेना उपनेते, माजी आमदार तानाजी सावंत यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. आमच्यामुळे सत्तेत आला आहात, आमच्या मांडीला मांडी लावून बसला आहात, घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करत आहात, हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहत आहोत, असा  गर्भीत इशारा तानाजी सावंत यांनी दिला.

अर्थसंकल्पात शिवसेनेला सापत्न वागणूक 

२०१९ पासून आजपर्यंत या तानाजी सावंतने पक्षाच्या विरोधात एकही भूमिका घेतली नाही किंवा पक्षाच्या विरोधात एक विधान केले नाही, असेल तर सांगावे, मी आता आमदरकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. आमच्या सर्वांच्या श्रद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जोडल्या आहेत. आमच्याकडे मागून काही मिळत नाही, रडल्याने काही मिळत नाही, आमच्याकडे आदेश चालतो आणि आदेशाची वाट आमदार, खासदार, मंत्री किंवा शिवसैनिक असो प्रत्येकजण आतुरतेने बघतो. आम्ही त्या आदेशानुसार चालतो. आम्हाला सत्तेत बसायची सवय नव्हती. नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडामधील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची मानसिकता एकच  झालेली आहे. शिवसेनेला कुठेतरी दुय्यम वागणूक मिळत आहे आणि हे अर्थसंकल्पातूनही दिसले आहे. विरोधी पक्षांचे ओरडायचेच काम आहे, त्यांना ते करू द्या. आज ५७ ते ६० टक्के बजेट हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिले जाते, जवळपास ३०-३५ टक्के बजेट हे काँग्रेसला दिले जाते, शिवसेनेला १६ टक्के बजेट दिले. या १६ टक्के बजेटमध्ये आज उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री आमचे असल्याने पगारावरतीच सहा टक्के जात असतील, तर मग विकासासाठी केवळ १० टक्के आहे, असेही सावंत म्हणाले.

(हेही वाचा #GoaCM कोकणी भाषेत शपथ घेत ‘प्रमोद सावंत’ सलग दुसऱ्यांदा बनले मुख्यमंत्री!)

आमच्या संयमाची परीक्षा बघू नका

आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आले आहात, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आहात, आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करता, हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहत आहे. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत रक्ताचा थेंब आमच्या शरिरात आहे, तोपर्यंत आम्ही वाट बघू, आम्ही सहन करू. आमच्या संयमाची तुम्ही अजिबात परीक्षा पाहू नका. जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही शांत आहोत, ही सत्ता तुम्ही स्वप्नात तरी बघितली होती का? केवळ आमच्या पक्षप्रमुखांच्या आदेशामुळे त्यांच्या निर्णयामुळे तुम्हाला आज सत्तेचे तोंड पाहायला मिळत आहे, त्याची फळे चाखायला मिळत आहेत. ज्यांनी तुम्हाला सत्तेत बसवले त्याच पक्षावरती तुम्ही एवढा अन्याय करतात, आम्ही का सहन करायचे?, असेही तानाजी सावंत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.