बाप असावा पण आयत्या बिळातला नागोबा नसावा! ‘चिपी’साठी राणेंनी फुशारकी मारू नये!

चिपी विमानतळ हे महाराष्ट्र सरकारच्या मालकीचे आहे. एमआयडीसीने हे विमानतळ उभे केले आहे. त्यामुळे उदघाटनाला मुख्यमंत्री ठाकरे यांना बोलावण्याची गरज नाही, असे नारायण राणे कोणत्या धर्तीवर बोलतात?, असे विनायक राऊत म्हणाले.

129

चिपी विमानतळासाठी नारायण राणे यांनी १९९९ आणि २००९ या वर्षात २ वेळा भूमिपूजन केले, त्यानंतर २०१४ साली एमआयडीसी ने अहवाल दिला, त्यामध्ये फक्त १४ टक्के काम झाल्याचे सांगण्यात आले. २२ वर्षे राणे यांनी काही केले नाही. अखेर शिवसेनेच्या प्रयत्नाने हे विमानतळ उभे राहिले आहे, राणेंनी विमानतळाचे श्रेय लाटण्याच्या फुशारक्या मारू नये. त्यांचे पुत्र म्हणतात, ‘बाप असावा तर असा’, ठीक आहे बाप असावा पण तो आयत्या बिळातला नसावा, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती हल्ला केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन चिपी विमानतळासाठी मी प्रयत्न केले आहेत, कुणीही श्रेय घेऊ नये, चिपीचे विमानतळाचे उदघाटन ७ ऑक्टोबला नव्हे तर ९ ऑक्टोबरला होणार आहे, त्यासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्याची गरज नाही, असे म्हटले होते. त्याचा प्रतिवाद शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला.

उदघाटनाची ९ ऑक्टोबर तारीख सेनेनेच ठरवली!

मागील २ वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंतच्या ४ हवाई मंत्र्यांशी चिपीसाठी बैठका घेतल्या, आपण स्वतः ६ वर्षे पाठपुरावा करत आहोत. आता हे विमानतळ वाहतुकीसाठी तयार झाले आहे. या मार्गावर विमान वाहतूक करणाऱ्या एअर अलायन्स कंपनीने तयारी पूर्ण केली आहे. या मार्गावरील ७२ आसनी विमान मुंबईत दाखल झाले आहे. कंपनीने मुंबई विमानतळात ७ ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग अशी विमान वाहतूक करण्यासाठी दुपारचा १ वाजताचा स्लॉट बुक केला आहे. तसे पत्र हवाई उड्डयन मंत्रालयाला देण्यात आले आहे. मात्र केंद्रीय हवाई उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना ७ ऑक्टोबर रोजी वेळ नाही, त्यामुळे त्यांच्या सोयीनुसार ९ ऑक्टोबर तारीख उदघाटनासाठी निश्चित झाली आहे. स्वतः मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री शिंदे यांच्यात संवाद होऊन हे ठरले आहे. असे असताना काहीही माहिती नसतात काही अज्ञानी मंडळी उगाच फुशारक्या मारत आहे, असे विनायक राऊत म्हणाले.

विमानतळ महाराष्ट्र सरकारचे!

चिपी विमानतळ हे महाराष्ट्र सरकारच्या मालकीचे आहे. एमआयडीसीने हे विमानतळ उभे केले आहे. त्याला केंद्राकडून केवळ परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे उदघाटनाला मुख्यमंत्री ठाकरे यांना बोलावण्याची गरज नाही, असे नारायण राणे कोणत्या धर्तीवर बोलतात? त्यांनी या विमानतळासाठी काय योगदान दिले? १९९९ आणि २००९ साली राणे यांनी दोनवेळा भूमिपूजन केले. २०१४ साली एमआयडीसीने विमानतळाचे काम फक्त १४ टक्के झाल्याचे सांगितले. त्यानंतर ६ वर्षे आपण स्वतः तसेच आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले त्यामुळे हे विमानतळ उभे राहिले आहे. त्यामुळे श्रेयाच्या फुशारक्या राणे यांनी मारू नयेत, असेही विनायक राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.