भाजपाकडून सध्या मराठीच्या मुद्यावरुन शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर स्थापन झालेली शिवसेना आता मराठीलाच विसरत चालली असून, एकप्रकारे ही मराठीची गळचेपीच चालली आहे. भाजपाच्या या टीकेचा समाचार शिवसेना उपनेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी घेत आधी महापालिकेत मराठी नगरसेवक द्या, मग मराठीवर बोला असे प्रत्युत्तर दिले.
(हेही वाचाः मुंबईतील मराठी मने(मते) जिंकण्यासाठी भाजपाचा ‘मराठी कट्टा’)
जाधवांनी घेतला तिखट समाचार
महापालिकेत शिवसेनेकडून मराठीची गळचेपी होत असल्याचा आरोप करत भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आपल्याच भूमीत मातृभाषेची गळचेपी भारतीय जनता पक्ष कदापि सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. तसेच मराठी अधिकाऱ्यांना डावलून अमराठी अधिकाऱ्यांना पदोन्नती देत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. या मराठीच्या मुद्यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी तोंड उघडत भाजपाचा तिखट शब्दांत समाचार घेतला.
(हेही वाचाः मुंबई पब्लिक स्कूलच्या नामफलकावरच १२ कोटींचा खर्च)
भाजपाचे ढोंग
भाजपाचे मुंबई महापालिकेत जे ८१ नगरसेवक आहेत, त्यातील ३० नगरसेवक हे मराठी आहेत, उर्वरित सर्व अमराठी आहेत. त्यामुळे ज्या पक्षाला महापालिकेत ५० टक्केही मराठी नगरसेवक देता येत नाहीत, त्यांनी मराठीवर बोलू नये. मराठीवर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. भाजपाचे हे मगरींचे अश्रू असल्याचे सांगत जाधव यांनी मराठी भाषा आणि मराठी माणसाची चिंता भाजपाने करू नये. मराठीचा मुद्दा शिवसेनेच्या नसानसांत भिनलेला आहे. आता निवडणूक जवळ आल्यावर ते मराठीवर बोलत आहेत, पण हे त्यांचे ढोंग आहे.
(हेही वाचाः समाजवादी पक्षही मराठी माणसांच्या प्रेमात)
निवडणुकीसाठी मराठीचा मुद्दा
मराठी माणूस त्यांना विचारत नसल्याने त्यांना हा मुद्दा हाताळावा लागत आहे. पण त्यांनी किती मराठी उमेदवार दिले. त्यांचे किती मराठी नगरसेवक निवडून आले हेही बघा. त्यांचे जे अमराठी नगरसेवक आहेत, त्यातील एक दोन सोडले तर कुणालाही मराठी येत नाही. त्यांनी आधी त्यांना मराठी भाषा शिकवावी, मगच मराठीवर बोलावे. शिवसेनेने कायमंच मराठी भाषेचा सन्मान राखला आहे. त्यामुळे मराठीचा मुद्दा केवळ निवडणुकीसाठी आठवलेल्या भाजपाने शिवसेनेवर बोलू नये, असेही बोल सुनावले.
(हेही वाचाः मुंबईतील मराठी शाळांबाबत भाजपा आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र, काय आहे पत्रात?)
Join Our WhatsApp Community