उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सध्या जोरदार चर्चेत आली आहे. ही यात्रा जळगावात येताच सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आमदार, मंत्री गुलाबराव पाटील यांना टार्गेट केले, त्यानंतर जळगावात मुक्ताईनगर येथे महाप्रबोधन यात्रेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. याबाबतचे आदेश प्रशासनाने पारित केले आहे.
बंडखोर आमदारांचा समाचार घेण्याचा प्रयत्न
उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जळगाव जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेदरम्यान बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सुषमा अंधारे यांच्या सभा होत आहेत. त्या बंडखोर आमदारांचा समाचार घेत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात धरणगाव येथे पहिली सभा, त्यानंतर पाचोरा, एरंडोल तर काल चोपडा येथे सभा पार पडली आहे. धरणगाव येथील सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने कालच प्रशासनाने युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना भाषणबंदी तसेच जिल्हा बंदी केली होती. त्यामुळे शरद कोळी यांना जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले आहे. तर महाप्रबोधन यात्रेची मुक्ताईनगरात सभा होत आहे. सुषमा अंधारे यांच्या या सभेला जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.
(हेही वाचा ‘महाप्रबोधन यात्रे’त स्त्रीचा अवमान, तृप्ती देसाई संतापल्या, वक्त्यांचे ‘प्रबोधन’ करणार!)
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
यासंबंधी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मुक्ताईनगरला चंद्राकांत पाटील आणि माझी संध्याकाळी सात वाजता सभा होती आणि त्यांची देखील सभा होती. जिल्ह्यात १४४ कलम लागू आहे. तसेच ५० मिटरच्या आता दोघांना परवानगी असल्याने जिल्हाधिकारी आणि एसपींनी विनंती केली की आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणे आपली जबाबदारी आहे. म्हणून आम्ही परवानगी नाकारत आहोत. कोणी आमच्या समाजावर बोलून तेढ निर्माण करत असेल, तर पालकमंत्री म्हणून ते थांबवण्याची जबाबदारी माझी आहे. मी त्यांनी (प्रशासनाने) दिलेल्या सुचनेनुसार आम्ही सभा घेणार नाही असा शब्द दिला आहे. त्यामुळे त्यांनी दोघांचीही परवानगी नाकारली आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करत आहोत. खरे तर आमच्या महाप्रबोधन यात्रेला परवानगी नाकारणे ही आमच्यासाठी पोच पावती आहे. आम्ही आमच्या सभेमध्ये कोणाच्याही भावना दुखावणारी वक्तव्ये करत नाही, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community