मनसेच्या पायावर शिवसेनेचा कळस

161

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्कमधील धुळीने त्रस्त असलेल्या स्थानिकांच्या समस्येवर कायमचा रामबाण उपाय शोधून काढत महापालिकेच्यावतीने संपूर्ण मैदान परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून येथील गवत हिरवेगार राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे काम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे शिवाजी पार्कमधील हिरवा गालिचा वर्षभर पसरलेला पहायला मिळणार आहे. पाच वर्षांपूर्वी यासाठी मनसेने जोरदार प्रयत्न केले. त्यांनी त्यासाठी योजनाही कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला. पण ही योजना निष्फळ ठरली आहे. परंतु आज मनसेने मिळवलेल्या परवानगीच्या आधारेच याचे काम सुरु असून मनसेने उभारलेल्या पायावर शिवसेनेने कळस चढवला असेच म्हणता येणार आहे.

मुरबाडमधून खास माती आणली

शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्कमध्ये महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या माध्यमातून ३५ विहिरी बांधून रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महापालिकेच्यावतीने शिवाजी पार्कमध्ये सात ठिकाणी प्रत्येक पाच विहिरी खोदण्यात येत आहे. तसेच पावसाच्या पाण्याचा विसर्ग विहिरींमध्ये करून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे यासाठीच्या योजनेचे काम सुरु असून हे काम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. या योजनेतंर्गत ३५ विहिरींमधून तीन ते साडेतीन लाख लिटर पाणी उपलब्ध होणार असून या पाण्याचा वापर मैदानासाठी प्रत्येक दिवशी अथवा एक दिवस आडही करता येवू शकतो. या कामावर शेवटचा हात फिरवला जात आहे. मैदानामध्ये गवत बिया मिश्रीत मातीचा वापर केला जात आहे. मुरबाडमधून खास ही माती आणली गेली आहे.

(हेही वाचा …तर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडू! चित्रा वाघांचा इशारा)

दोन विहिरी या रेन वॉटर हार्वेस्टींगची यंत्रणा

मात्र, सन २०१५-१६मध्ये स्थानिक मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कमधील रेन वॉटर हार्वेस्टींगची ही योजना राबवण्यासाठी सीआरझेडपासूनच सर्व प्रकारची परवानगी आणली होती. तत्कालिन आयुक्त सीताराम कुंटे आणि तत्कालिन पर्यावरण सचिव वल्सा नायर सिंह असताना ही परवानगी प्राप्त झाली होती. त्यानुसार महापालिकेने शिवाजी पार्कमध्ये दोन विहिरी या रेन वॉटर हार्वेस्टींगची यंत्रणा बसवून त्या पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कालांतराने शिवाजी पार्कमधील खोदकाम आणि गंजलेले स्प्रिंकरर्स त्यामुळे ही यंत्रणा नादुरुस्त झाली होती.

मनसेकडून योजनेचे स्वागतच

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कमध्ये सुरु असलेल्या योजनेचे स्वागतच केले आहे. शिवाजी पार्करांसाठी ही योजना असली तरी मनसेने काही वर्षांपूर्वी जे अथक प्रयत्न केले आहेत, त्या परवानगीच्या आधारेच हे बांधकाम होत आहे. जर ही परवानगी शासनातील अधिकाऱ्यांच्या मागे लागून मिळवली नसती तर हे बांधकाम करता आले नसते. त्यामुळे मनसेमुळेच शिवाजी पार्कमधील ही योजना कार्यान्वित होऊ शकली हे मान्य करायला हवे. महापालिका जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महापालिकेने स्थानिक रहिवाशांची मागणी विचारात घेता पुन्हा नव्याने ही योजना हाती घेतली.आतापर्यंत शिवाजी पार्कमध्ये ३५ ट्युब वेल बनवण्याचे काम पूर्ण झाले असून त्यांना जोडणाऱ्या पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिनींचेही काम पूर्ण होत आहे. त्यामुळे जानेवारी पहिल्या आठवड्यापर्यंत ही कामे पूर्ण होऊन येथील योजनेला प्रारंभ होईल. त्यामुळे शिवाजी पार्कमध्ये कायमच पाण्याची फवारणी करून तेथील हिरवळ कायम राखण्यास मदत होईल. परिणामी धुळीचा त्रास स्थानिकांना होणार नाही.

तीन ते साडेतीन लाख लिटर पाणी दैनंदिन उपलब्ध होऊ शकते

मनसेने यापूर्वी जी योजना राबवली होती, ती यंत्रणा नादुरुस्त झाली होती. त्यात एका विहिरीच्या माध्यमातून स्प्रिंकरर्सद्वारे पाणी फवारणी करण्याची योजना होती. संपूर्ण शिवाजी पार्कमधील एक लाख चौरस मीटर क्षेत्रफळासाठी २ लाख लिटर पाण्याची आवश्यक असते. त्यामुळे यासाठी भुगर्भातील पाण्याच्या पातळीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या सल्लागाराच्या अहवालानंतर ३५ ट्युब वेल बनवण्यात आल्या असून यातून तीन ते साडेतीन लाख लिटर पाणी दैनंदिन उपलब्ध होऊ शकते. यामध्ये जिओ सिंथेटिक पाईपचा वापर केला आहे. जेणेकरून पाईप गंजले जाणार नाहीत. मनसेने जी परवानगी घेतली होती, त्याच परवानगीच्या आधारे ही कामे होत असली, तरी त्यांनी केलेल्या कामांच्या तुलनेत अधिक चांगल्याप्रकारे आणि कायमस्वरुपी कार्यान्वित राहतील अशा प्रकारची ही योजना असल्याचे दिघावकर यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.