आता शिवसेनेचे शेवाळेही ‘ख्वाजा’च्या हवाली!

सध्या शिवसेनेला राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसच्या आग्रहाखातर हिंदुत्वाच्या मुद्यांना बगल द्यावी लागत आहे. असे करत असताना हळूहळू सेना विचारानेही काँग्रेसप्रमाणे होऊ लागली का, असा प्रश्न निर्माण व्हावा, अशा घटना घडत आहेत. 

110

२५ वर्षे हिंदुत्वाच्या विचारांवर आधारित भाजपची युती तोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी उभे आयुष्य काँग्रेसची विचारधारा अस्पृश्य होती. त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सेनेने सत्ता स्थापन केली. मात्र दुसरीकडे ‘आमचे हिंदुत्व अजूनही शाबूत आहे’, असाही दावा सेना करत आहे. वास्तव मात्र निराळे आहे. महाआघाडीच्या दीड वर्षांत सेनेने अशा काही भूमिका घेतल्या आहेत, ज्यामुळे सेनेच्या हिंदुत्वावर आता शंका उपस्थित होऊ लागली आहे.

उड्डाणपुलाला सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज नाव देण्याची मागणी! 

शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे एक मागणी केली आहे.  घाटकोपर-मानखुर्द लिंकरोडवर छेडानगर ते मानखुर्दपर्यंत होत असलेल्या उड्डाणपुलास सुफी संत ‘सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज (मोईनुद्दीन सुफी चिश्ती – अजमेरी) यांचे नाव देण्यात यावे, अशी ही मागणी आहे. ऑल इंडिया उल्मा अँड माशयक बोर्ड आणि तारिक उल्मा ए अहले सुन्नत या संस्थांनी आपल्याकडे  या पुलाला हे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली. त्याअनुषंगाने आपण ही मागणी करत असल्याचे खासदार शेवाळे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

letter 1

७० टक्के मुस्लिम संख्या असल्याने मागणी मान्य करा! 

छेडानगर ते मानखुर्द दरम्यान सुमारे ७० टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. त्यामुळे छेडानगर ते मानखुर्दपर्यंत होत असलेल्या उड्डाणपुलास सुफी संत ‘सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज (मोईनुद्दीन सुफी चिश्ती – अजमेरी) यांचे नाव देऊन येथील मुस्लिम समाजाच्या भावनांचा सन्मान करावा, असेही खासदार शेवाळे यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

(हेही वाचा : शिवसेना पुन्हा म्हणणार…तरीही आम्ही हिंदुत्ववादीच!)

हे एकगठ्ठा मतांच्या राजकारणासाठी लांगुलचालन नव्हे का? 

एखादी निवडणूक आली कि, एकगठ्ठा मतांसाठी अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करण्याची पद्धत काँग्रेसने रुजवली आहे. याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम विरोध केला. आज त्याच धर्तीवर येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने काँग्रेसच्या गठ्ठा मतांचे राजकारण आत्मसात केले आहे का, असा प्रश्न खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीवरून उपस्थित होत आहे.

असा सुरु झाला सेनेचा काँग्रेसी वाटेवरचा प्रवास! 

‘एमआयएम’सोबत युती!

शिवसेनेने अमरावती येथील महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीसाठी चक्क एमआयएमशी हातमिळवणी केली. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण कारणार असल्याचे गर्वाने सांगणाऱ्या आणि हे नामकरण बाळासाहेबांनी आधीचे केले आहे, अशी पुष्टी देणाऱ्या शिवसेनेच्या हाती सत्ता येऊन दीड वर्ष उलटले. तरीही अजून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर केले नाही. विशेष म्हणजे त्या नामकरणालाच एमआयएमचा विरोध आहे. त्यामुळे या मुद्यावरून औरंगाबादमध्ये समोरासमोर उभी ठाकणारी सेना-एमआयएम अमरावतीत मात्र गळ्यात गळे घातले.

अयोध्येत जाणे टाळले!

सर्वोच्च  न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहू नये, अशी भूमिका काँग्रेसने मांडल्यावर मुख्यमंत्री यांनी जाणे टाळले होते.

(हेही वाचा : कोणी बनवली शिवसेनेला टिपूची हिरवी सेना?)

बाळासाहेब ‘जनाब’ झाले!

नवीन वर्षानिमिताने शिवडी भागातील सेनेचे माजी शाखाप्रमुख सुरेश काळे यांनी शिवसेनेच्या नावाने दिनदर्शिका छापली. ती चक्क उर्दू भाषेत होती. त्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो घेतला. त्यामध्ये बाळासाहेबांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ ऐवजी ‘जनाब’ असा केला होता. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

नमाज पठणाच्या स्पर्धेची घोषणा!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकेकाळचे विश्वासू शिवसैनिक शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी चक्क नमाज पठणावर स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली होती. त्यामुळेही शिवसेनेच्या हिंदुत्वावर पुन्हा टीकाटिप्पणी करण्यात आली. तेव्हाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी मौन बाळगले.

टिपू सुलतानची जयंती साजरी!

मीरा-भाईंदर येथील शिवसेनेचे युवा शहर संघटक सलमान हाशमी यांनी टिपू सुलतानच्या जयंतीच्या निमिताने शुभेच्छा दिल्या होत्या. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे या सर्वांचे फोटो छापले. त्यामध्ये शिवसेनाप्रमुखांना हिरव्या रंगाचा शेला घातला होता. तेव्हाही पुन्हा एकदा शिवसेनेला टिकेला सामोरे जावे लागले, तरीही शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर एकाक्षराने याचा जाब विचारला नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.