राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. आता नवनीत राणा यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. असल्या फालतू गोष्टींवर बोलण्यापेक्षा आम्ही विकासांच्या कामावर बोलतो, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
असल्या फालतू गोष्टींवर आम्ही बोलत नाहीत. राज्यात अनेक गोष्टी आहेत ज्या करणे अत्यंत गरजेचे आहे. आम्ही समाजाच्या हिताचे काम करत आहोत, त्यामुळे त्यावर आम्हाला बोलायला आवडते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे.
(हेही वाचाः मुंबईत 29 ठिकाणांवर NIA ची छापेमारी; माहिम दर्ग्याचा ट्रस्टी सोहेल खंडवानी आणि सलीम फ्रूट ताब्यात)
राणा करणार शहांकडे तक्रार
लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर खासदार नवनीत राणा या सोमवारी दिल्लीकडे रवाना झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपण उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारची तक्रार करणार असल्याचे राणा यांनी म्हटले आहे.
कारवाई नाही
उद्धव ठाकरे यांच्या गुंडांकडून आमच्या अमरावती आणि मुंबईतील घरांवर हल्ला करण्यात आला. त्याविरोधात आम्ही तक्रार दाखल केली आहे. त्यावर अजून कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे कठार कारवाईची मागणी आपण केंद्रीय मंत्र्यांकडे करणार असल्याचेही नवनीत राणा यांनी सांगितले.
(हेही वाचाः राणांना डिस्चार्ज, आता किशोरी पेडणेकर ‘लिलावती’त!)