शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडाचा आजचा तिसरा दिवस असून हे बंड अद्याप सुरूच आहेच. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या चाळीशीपार गेली असून आता ती ४७ वर पोहोचली आहे. रामटेकचे शिवसेना आमदार आशिष जैस्वाल यांच्यासह चार आमदार गुवाहाटी दाखल झाले आहेत. गुरूवारी आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत.
(हेही वाचा – “पक्षात विलीन व्हा सरकार स्थापन करू, भाजपची शिंदेंना अट?”; प्रकाश आंबेडकरांचं ट्विट)
आशिष जैस्वाल यांच्यासह काही मोठे आमदार देखील शिंदे गटात सामील होणार असून शिंदे गटातील संख्याबळ वाढताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, आपल्यासोबत असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे.
आशिष जैस्वाल हे शिवसेना पक्षप्रमुखांचे निकटवर्तीय मानले जात असून ते बुधवारपासूनच नॉट रिचेबल होते. अखेर आज ते शिंदे गटात सामील झाल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा निवासस्थान सोडून मातोश्री निवासस्थानी यायला निघाल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक शिवसैनिक रस्तोरस्ती उभे होते. परंतु दादर माहीममध्ये आल्यावर तिथून पुढे जात असताना या विभागाचे विभागप्रमुख व आमदार सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे कुठेच दिसले नाही. दोघांचा फोनही नॉटरिचेबल आल्यानंतर ते गुवाहटीत दाखल झाल्याचे समोर आले.
बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांना प्रत्यक्षात चर्चा करण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातली. त्यानंतरही शिवसेनेतील आमदारांची गळती कमी होताना दिसत नसल्याने शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभे राहिल्याचे दिसून येत आहे.