हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेत दुसरे बंड, 48 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती

241

विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आता राजकीय घडामोडी सुपरफास्ट झाल्या आहेत. एकीकडे काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीमध्ये नाराजी असताना, आता शिवसेनेच्या गोटात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि मविआ सरकारचे मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेवर नाराज झाले आहेत. त्यामुळे जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने शिवसेनेला जय महाराष्ट्र केला, तर हा शिवसेनेला मुळापासून हादरवणारा धक्का असेल बोलले जात आहे.

अजूनही एकनाथ शिंदे यांनी आपल्या नाराजीचे कारण स्पष्ट केले नसले तरी त्यांच्या एका ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे. आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे कट्टर शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे, त्यामुळे आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा करणार नाही, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन एकनाथ शिंदे नाराज असल्याचे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे हे कारण असेल, तर 48 वर्षांपूर्वी शिवसेना ज्या मुद्द्यावरुन फुटली होती त्याचीच पुनरावृत्ती होणार असल्याचे बोलले जात आहे.

शिंदेंची घुसमट?

एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राज्यात सत्तेत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका ही सुरुवातीपासूनच कुठेतरी हिंदुत्वाच्या विरोधात राहिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची महाविकास आघाडीत घुसमट होत असल्याच्या चर्चा कानावर येत आहेत. त्यामुळे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.

1974 मध्ये काय झाले होते?

पण याआधी तब्बल 1974 साली शिवसेनेत याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मोठा राजकीय भूकंप झाला होता. 1974 साली मध्य मुंबईत लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी हिंदू महासभेकडून विक्रम सावरकर हे निवडणुकीसाठी उभे होते. या निवडणुकीत हिंदुत्ववादी विचारांचे विक्रम सावरकर यांना पाठिंबा देण्यात यावा, अशी भूमिका कट्टर शिवसैनिक बंडू शिंगरे यांनी घेतली होती. पण शिवसेनेने काँग्रेसचे रामराव आदिक यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यावेळी शिवसेनेत खळबळ माजली आणि फार मोठे बंड झाले. त्यामुळे शिंगरे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

मात्र, या निवडणुकीत रामराव आदिक यांचा पराभव झाला तर कम्युनिस्ट पक्षाच्या रोझा देशपांडे निवडून आल्या. यामुळे त्यावेळी या बंडाचा मोठा फटका बसला आणि शिवसेनेने पाठिंबा दिलेली काँग्रेस थेट तिस-या क्रमांकावर फेकली गेली. त्यावेळी शिवसेनेवर जहरी टीका करण्यात आली. महाराष्ट्र टाईम्स या दैनिकाने त्यावेळी ‘गाढव गेले आणि ब्रह्मचर्यही गेले’, अशा शब्दांत शिवसेनेवर टीका केली होती.

असा आहे योगायोग

योगायोग असा की त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेत बंड झाले आणि त्या उमेदवाराचा पराभव झाला. आताही विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेनेचा पाठिंबा असलेले काँग्रेसचे उमेदवारच पराभूत झाले आहेत. त्यामुळे 48 वर्षांपूर्वी जो राजकीय भूकंप शिवसेनेत आला होता, त्याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बंड पुकारले आहे का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.