हे कसले शिवसेनेचे वाघ!

नालेसफाईच्या कामाबाबत सध्या संपूर्ण मुंबईत बोंबाबोंब आहे. ती काही एकट्या आमदार दिलीप लांडे यांच्या मतदार संघात नाही. पण कंत्राटदाराला मारले म्हणजे आपण जनतेचे पाईक आहोत, असेच दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

122

चांदिवलीतील शिवसेनेचे आमदार दिलीप (मामा) लांडे यांचा एक नालेसफाईच्या कामाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये मामा लांडे आणि त्यांचे कार्यकर्ते हे विभागातील नाल्याची सफाई न झाल्याने कंत्राटदाराच्या माणसाला चिखलात बसवून त्यांच्यावर नाल्यातील कचरा टाकून अभिषेक करताना दिसत आहे. एखादा माणसाला अशाप्रकारे अमानुषपणे वागवणारा लोकप्रतिनिधी प्रथमच पाहिला असेल. विशेष म्हणजे लांडे ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात, तो पक्ष महापालिकेत आणि राज्यात सत्तेवर आहे. त्यांचे पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि त्यांच्या पक्षाचे आमदार जर अशाप्रकारचे अमानुष कृत्य करत असतील, तर पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांना हे मान्य आहे काय?

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला प्रथम जाब विचारायला हवा!

नाल्याची सफाई झाली नाही म्हणून कंत्राटदाराला धडा शिकवण्यासाठी ज्याप्रकारे व्यक्तीवर कचरा आणि चिखलाचा अभिषेक झाला, ते पाहता त्या व्यक्तीवर आणि त्यांच्या नातेवाईकांवर काय प्रसंग ओढवला असेल. ती व्यक्ती कुणाचा भाऊ असेल, कुणाचा मुलगा असेल किंवा कुणाचा पती असेल. अशाप्रकारे कंत्राटदाराला जाब विचारण्याचा अधिकार लांडे यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीला कुणी दिला? मुळात नालेसफाईच्या कामांसाठी महापालिका प्रशासनाने कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. ती काही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केली नाही. जर कंत्राटदार काम करत नसेल तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला प्रथम जाब विचारायला हवा. पण अधिकारी राहिले बाजुला कंत्राटदारालाशीच हे बेवर्तन करून मोकळे झाले.

(हेही वाचा : शिवसेना आमदाराने कॉन्ट्रॅक्टरला झोडले… पण स्वतः कोरोनाचे नियम तोडले)

आमदार लांडे अधिकाऱ्यांना वचकून 

नालेसफाईचे काम करून घेण्याची जबाबदारी ही अधिकाऱ्यांची आहे. कंत्राटदाराला जी काही शिक्षा करायची आहे, ती करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. जर लोकप्रतिनिधी म्हणून मामा लांडे यांनी हे वर्तन केले असेल, तर त्यांनी अधिकाऱ्याला याचा जाब विचारायला हवा होता. पण अधिकाऱ्यांशी पंगा घेण्याची हिंमत लांडे यांच्यामध्ये नाही. कारण लांडे यांच्या सर्व कामांचा लेखाजोखाच अधिकारी मांडून मोकळे होतील. त्यामुळे अधिकाऱ्यांना लांडे हे थोडे वचकूनच आहे. मामा लांडे यांच्यावर जे मनसेचे संस्कार आहेत, त्याप्रमााणे त्यांनी वर्तन घडवले. मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अशाचप्रकारे खड्डे न बुजवल्यामुळे जीवानी कंत्राटदाराच्या माणसाला खड्ड्यात उभे केले होते. त्यानंतर रस्ते विभागाचे तत्कालिन प्रमुख अभियंता असलेल्या संजय दराडे यांनाही खड्डयात उभे केले होते. तसेच एका अधिकाऱ्याला जी उत्तर विभागातील कार्यालयात नजरकैदेत ठेवले होते. परंतु त्यावेळी हेच मामा लांडे हे त्यांच्या वर्तनाला चुकीचे ठरवत असत. त्यांच्या या कृत्याचा अप्रत्यक्ष निषेध करत असत. परंतु आता त्याच लांडे यांना कंत्राटदाला सफाई न झाल्याने त्यांनी धडा शिकवला.

ही निव्वळ जनतेची दिशाभूल! – मनसे

मुंबईतील नालेसफाईचे काम योग्यप्रकारे झाले असून या समाधानकारक कामांबाबत महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी प्रशस्तीपत्र कंत्राटदारांना जाहीर केले. असे असताना मामा लांडेंच्या विभागात हे काम झाले नाही, असे कसे? मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांची प्रतिक्रीया यावर बोलकी आहे. ते म्हणतात, जर शिवसेनेच्या महापालिकेतील नेत्यांना नालेसफाई झाल्याचे दिसते, याचा अर्थ त्यांना टक्केवारी मिळालेली आहे. कदाचित लांडे यांना टक्केवारी दिली नसेल म्हणून त्यांना कंत्राटदाराला असे चिखलात बसवावे लागते. महापालिकेत तर शिवसेनेची सत्ता आहे आणि कंत्राटदारांची नेमणूक त्यांच्या प्रशासनाने केली आहे. मग सफाई झाली नाही म्हणून बोंबाबोंब करत स्वत: साफसफाईचे सोंग घ्यायचे ही निव्वळ जनतेची दिशाभूल आहे, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा :नालेसफाईच्या नावावरून मुंबईकरांना कितीदा मूर्ख बनवाल!)

सत्तेचा माज आला की काय?

नालेसफाईच्या कामाबाबत सध्या संपूर्ण मुंबईत बोंबाबोंब आहे. ती काही एकट्या लांडे यांच्या प्रभागातच नाही. पण कंत्राटदाराला मारले म्हणजे आपण जनतेशी पाईक आहोत, असेच दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लांडे हे चांदिवलीत नशिबाने निवडून आले आहेत. अख्खा कुर्ला चांदिवली आपल्या मुठीत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आजवर मनसेच्या तिकीटावर कधी निवडून येता आले नाही, ते शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शक्य झाले. पण शिवसेना म्हणून नव्हे तर शिवसेना आणि भाजप युतीमुळे लांडे निवडून आले. भाजपचे नगरसेवक हरिष भांदिर्गे यांच्या प्रभागात मिळालेले मताधिक्य हे लांडे यांना विजयाच्या समिप घेवून केले. परंतु आज त्याच भांदिर्गे यांच्याशी जे प्रकार सूडबुध्दीने वागत आहे, ते पाहता एकप्रकारे त्यांनाही सत्तेचा माज आला की काय, असे वाटू लागले आहे. लांडे यांच्याकडून कंत्राटदाराला अशाप्रकारे वर्तणूक मिळण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी त्यांचे अनेक किस्से आहेत. सहा नगरसेवकांना सोबत घेवून मनसेशी दगाबाजी करत शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. परंतु शिवसेनेने पक्षात घेतलेल्या मामांवर आजही मनसेचेच रक्त सळसळतंय. त्यामुळे या घटनेनंतर आता हे कसले शिवसेनेचे वाघ, असा प्रश्न कुर्लावासियांसह सर्व उपस्थित करू लागले आहेत

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.