मंत्री सामंतांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला टोला; म्हणाले, जर आमच्यासोबत गुवाहाटीला आले असते..; नेमकं काय घडलं?

137

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्यातील कामकाजाला बुधवारपासून सुरुवात झाली. या दिवशी कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी राज्यात झालेला अवकाळी पाऊस, शेतमालाचे नुकसान आदी मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकारला घेरले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. यादरम्यान मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना मिश्किल भाषेत टोला लगावला. आणि सभागृहात एकच हशा पिकला.

नक्की काय झाले?

बुधवारी विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे लक्षवेधी मांडत असताना म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी त्यांचा राज्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्र्यांचाही राज्यमंत्री होतो. माझ्या मतदारसंघातील शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतींना दिवसाआड तरी पाणी पुरवठा मिळावा, रोज घनकचरा उचलला जावा म्हणून एका नगरपालिकेची स्थापना केली. त्यावर माझी सही झाली, त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांची सही झाली. पण मला माहित नाही त्यावर काय झाले.

पुढे तनपुरे म्हणाले की, पुन्हा दोन महिन्यांपूर्वी शिक्कामोर्तब झालेल्या नागरदेवळे नगरपालिकेची ग्रामपंचायत झाली. हे कसे काय झाले? याचे कोडे मला काही उलगडले नाही. एका बाबतीत सकारात्मकता दाखवायची आणि दुसरीकडे मात्र नकारात्मक निर्णय घ्याचे. याचे मला मंत्री महोदयांनी उत्तर द्यावे.

प्राजक्त तनपुरेच्या या लक्षवेधीवर बोलत असताना उदय सामंत यांनी त्यांना मिश्किल टोला लगावला. उदय सामंत म्हणाले की, ‘सदर लक्षवेधी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अखत्यारितील आहे, त्यामुळे स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे. आणि सन्माननिय सदस्यांनी आमच्या दोघांचा उल्लेख केला की, आमच्या दोघांचे राज्यमंत्री होते. ते जर आमच्यासोबत गुवाहाटीला आले असते, तर पुन्हा त्यांना राज्यमंत्री करा, अशी शिफारस केली असती.’ उदय सामंत यांच्या या उत्तरानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

(हेही वाचा – हक्कभंग प्रस्ताव: संजय राऊतांना खुलासा करण्यास मुदतवाढ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.