महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेल आहे, असं नेते मंडळी सांगत असले तरी आता नेत्यांमध्येच धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांना निधी जाहीर केला आहे. पण महाविकास आघाडीतील निधी वाटपावरून शिवसेना नेत्यांमधील खदखद अद्यापही कायम आहे. याच निधी वाटपावरून महाविकास आघाडीत ही धुसफूस सुरू आहे. दरम्यान, ‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार आहे’ असे म्हणत शिवसेनेचे मुंबईतील खासदार व नेते गजानन किर्तीकर यांनी राष्ट्रवादीवर नाराजी दर्शविली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभ गजानन किर्तीकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी किर्तीकर यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीला सरकारला घरचा आहेर दिल्याचे समोर आले आहे.
काय म्हणाले किर्तीकर?
आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार आहे, असे म्हणत गजानन किर्तीकरांनी राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली आहे. तर आता एका आमदारावर किती भार आहे. त्याने किती गावामध्ये पाहायचे आहे. आता मला काही निवडणूक लढायची नाही, त्यामध्ये मला काही पडायचे नाही. पण मला शिंदे गावापुरते मर्यादीत कामं आहे. माझ्याकडून जेवढं होतं तेवढी काम मी करत असतो. काय स्पर्धा सुरू आहे हे सर्वांना माहिती आहे. राष्ट्रवादीवाल्यांची काय डॅम्बिसगिरी चालू आहे. नाव घ्यायला हरकत नाही, असे म्हणत किर्तीकरांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
Join Our WhatsApp Community