महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवरील सातत्याने गंभीर आरोप लावण्यात येत आहेत. ठाकरे सरकारमधील शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना अलीकडेच एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर आता शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना सुद्धा पालघर जिल्हा न्यायालयाने 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लवकरच भाजपच्या साडे तीन नेत्यांना तुरुंगात धाडण्याचे विधान सोमवारी केले. पण आता लगेच शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना न्यायालयाने शिक्षा दिल्यामुळे शिवसेनेच्या अडचणींत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
का झाली शिक्षा?
पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी जागेच्या व्यवहारातून चिराग किर्ती बाफना यांना दीड कोटी रुपयांचे धनादेश(चेक) दिले. मात्र हे धनादेश वठले न गेल्याने (चेक बाऊन्स) त्यांच्या विरोधात पालघर जिल्हा न्यायालयात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता पालघर जिल्हा न्यायालयाने गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी 75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
(हेही वाचाः नाना पटोले ‘नौटंकीबाज’ नेते! फडणवीसांचा हल्लाबोल)
बच्चू कडूंनाही शिक्षा
राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी यासंदर्भात 2017 मध्ये तक्रार दाखल केली होती. बच्चू कडू यांनी मुंबईत 42 लाख 46 हजार रुपये किंमतीचा स्वतःच्या मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही. या प्रकरणी न्यायालयाने बच्चू कडू यांना 25 हजार रुपये दंड, तसेच 2 महिने सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
(हेही वाचाः बच्चू कडूंमुळे ‘मविआ’ला काळिमा, काय आहे कारण)
काय म्हणाले राऊत?
‘हमने बहुत बरदाश्त किया है…तो बरबाद भी हम ही करेंगे, असं म्हणत राऊतांनी भाजपाचे साडेतीन नेते, अनिल देशमुख असलेल्या तुरुंगात असतील आणि देशमुख बाहेर असतील, असं म्हणत मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता भाजपाचे ते साडे तीन नेते कोण आहेत? याचा शोध सुरू झाला आहे.
(हेही वाचाः भाजपाचे कोण आहेत ते साडे तीन नेते? राऊतांच्या वक्तव्याने सुरु झाला शोध)
Join Our WhatsApp Community