‘इतकं गुळगुळीत, बुळबुळीत आणि बुळचट’, पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर राऊतांनी राज्य सरकारलाच फटकारले

131

एसटी कर्मचा-यांनी शुक्रवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी आक्रमक आंदोलन केल्यानंतर त्या गोष्टीचा आता राजकीय स्तरातून निषेध करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे पोलिस यंत्रणेचं अपयश असल्याचं म्हटल्यानंतर, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.

गुळगुळीत, बुळबुळीत आणि बुळचट सत्ताकारणाचे परिणाम आपल्याला भोगावे लागल्याचे सांगत संजय राऊत यांनी राज्य सरकारवरच टीका केली आहे.

(हेही वाचाः शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला हा कट… राऊतांचा आरोप)

गुळगुळीत, बुळबुळीत आणि बुळचट

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सदावर्ते यांनी याआधीही अनेकदा शरद पवार यांच्या विरोधात आक्रमक विधाने केली आहेत, त्यामुळे याआधी त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, या प्रश्नावर राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा सरकारच्या संयमाचा कडेलोट आहे. इतका संयम आणि सहिष्णूता बरी नाही, हे आम्ही वारंवार सरकारला सांगत आहोत. कायद्यानं अनेकदा कठोर व्हायला हवं. इतकं गुळगुळीत, बुळबुळीत आणि बुळचट सत्ताकारण चालत नाही, त्याचेच परिणाम आज आपण भोगत आहोत, असं म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

हा दळभद्रीपणाचा कळस

विरोधी पक्ष जे काही करत आहेत हा दळभद्रीपणाचा कळस आहे. ज्यांचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात मोठं योगदान आहे त्यांच्याच घरावर असा हल्ला करणं हे शोभनीय नाही. गुणरत्न सदावर्ते यांना भाजपचा पाठिंबा आहे. त्यांना शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध गरळ ओकण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्यात येत आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी भाजपवर केला आहे.

(हेही वाचाः मी शरद पवारांवर गुन्हा दाखल केला आहे, आमच्या जीवाला धोका आहे! सदावर्तेंच्या पत्नीचा आक्रोश)

भाजप नेत्यांवर निशाणा

ज्याप्रकारे भाजपचे नेते या हल्ल्याचे समर्थन करत आहेत, हा त्यांचा हलकटपणा आहे. ज्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठं केलं तेच आता भाजपमध्ये जाऊन पवारांच्या विरोधात बोलत आहेत, असं म्हणत त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.