मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींच्या भोंग्यांवरुन आवाज उठवल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यांच्यावर महाविकास आघाडी मधील नेत्यांकडून जोरदार टीकाही करण्यात येत आहे. याच बाबतीत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्यातील हिंदू मंदिरांना मोठा फटका बसल्याने हिंदू समाजातच नाराजी असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न
मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील हिंदू मंदिरांना मोठा फटका बसला आहे. भजन, कीर्तन करणा-यांना त्याचा जास्त फटका बसला आहे. त्यामुळे राज्यात आज हिंदू समाजात नाराजीचं वातावरण आहे. त्यांनी हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. पण राज्यातील जनता सुजाण असल्यामुळे त्यांचा हा डाव यशस्वी झाला नाही.
(हेही वाचाः राज्यातील नेत्यांनीच थकवले करोडोंचे वीज बिल, वाचा कोणाची किती थकबाकी)
राजकीय भोंगे गायब झाले
राज्यात कायद्याचे राज्य चालते. महाराष्ट्रात कुठेही संघर्ष नाही, महाराष्ट्रात शांतता आहे. काही लोक राज्यातील हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत होते. भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्यात हिंदू-मुसलमानांत दंगली घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण महाराष्ट्रातील जनतेने त्यांना उत्तर दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्यात काम करण्यात येत आहे, त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही नाही. पोलिसांच्या भीतीने राज्यातील सगळे राजकीय भोंगे आता गायब झाले आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
(हेही वाचाः आदित्य ठाकरेंचे स्वप्न भंगणार? ड्रीम प्रोजेक्टला न्यायालयाने ठरवले बेकायदेशीर)
केंद्र सरकारने धोरण ठरवावे
याबाबत केंद्र सरकारने संपूर्ण देशात एक राष्ट्रीय धोरण राबवावे, हे मी याआधीही सांगितले होते. संपूर्ण देशात हे धोरण लागू करावे हे आमचे म्हणणे आहे. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही हीच भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारला आता हे करावे लागेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community