गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अद्याप दिलासा मिळाला नसल्याचे समोर आले आहे. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब करून पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आज होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. तर त्यांचा कोठडीतील मुक्कामही अजून वाढला आहे.
(हेही वाचा – शिवसेनेचं पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…)
दरम्यान, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेल्या राऊतांच्या जामीन अर्जावर ५ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली होती. त्यामध्ये त्यांना १० ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आज सोमवारी वेळेअभावी त्यांच्या अर्जावर सुनावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीची देखील चौकशी सुरू केली होती. तसेच राऊत यांचा निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना देखील अटक करण्यात आली होती. प्रवीण यांच्या मदतीने राऊत यांनी हा गैरव्यवहार केला. यानंतर मनी लॉंड्रिंगची रक्कम तपासण्याचे काम सुरू असल्याचे ईडीकडून सांगितले जात आहे. या व्यवहारात प्रवीण राऊत यांनी मिळालेली रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप देखील ईडीने केला आहे. तर ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगत त्याचे खंडन केले असून राजकीय आकसाने आपल्याविरोधात खोटे आरोप केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
Join Our WhatsApp Community