केंद्रीय तपास यंत्रणांना विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात टार्गेट दिले जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना गोव्याच्या विजयाचे शिल्पकार जरी म्हटले गेले असले, तरी गोव्यात कधीच पक्ष जिंकत नाही, तिथे केवळ व्यक्तीच जिंकते आणि त्या व्यक्ती सरकार बनवतात, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
काय म्हटले राऊत?
गोव्यात भाजपच नव्हे तर कोणीही असले तरी वाद निर्माण होतो. गोव्यात निवडणुका जिंकल्याचा कोणीही टेंभा मिरवू नये. गोव्यातील राजकारण हे कोणाच्या हातात राहत नाही. आमचे मित्र देवेंद्र फडणवीस गोव्याच्या विजयाचे शिल्पकार असल्याने भाजप कार्यालयात त्यांचे मोठे जंगी स्वागत झाले, ढोल वाजवले, लेझीम खेळले यासोबतच विधानभवनातही त्यांचे मोठे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचा नेता गोवा जिंकून आला याचा आनंद झाला, पण गोवा कोणाला जिंकता येत नाही. गोव्याचे राजकारण फार विचित्र आहे. तिथे कधीही पक्ष जिंकत नाही, तर व्यक्ती जिंकते. त्यातील काही व्यक्ती एकत्र येऊन सरकार बनवतात, असे राऊत म्हणाले.
(हेही वाचा – “देशात आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय पण…”)
दरम्यान, सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान मोदींचं कौतुक केल्यानंतर भाजप नेत्यांकडून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, देशाचे पंतप्रधान एका पक्षाचे नसतात हे मोदींना समजायला हवे. त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना गुडघ्यापेक्षा खुजं करुन टाकले आहे. हे मी आता म्हणत नसून अनेक वर्षांपासून सांगत आहे. मोदींचं नेतृत्व या देशात सर्वात उंच आहे, पण भाजपाने त्यांना खुजं करुन टाकले आहे. ते फक्त आमचेच पंतप्रधान आहेत, आमच्याच पक्षाचे आहेत, पक्षातील एका गटाचे आहेत असे वातावरण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी निर्माण केले असून करतही आहेत. तर ते पुढे असेही म्हणाले की. पंतप्रधान देशाचं नेतृत्व करत असून एका पक्षाचे नाही. पंतप्रधानांची गेली काही भाषणं ऐकली तर त्यांनीही या चक्रातून बाहेर पडले पाहिजे असे वाटते. मी देशाचा नेता आहे, असे त्यांनी स्वत:ला बजावले पाहिजे.
Join Our WhatsApp Community