कोरोनामुळे देशात अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संसदेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी सोमवारी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. देशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. बेडस् नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसही उपलब्ध नाही. हे दुसरे तिसरे काही नसून संपूर्णपणे गोंधळ माजल्याचे चित्र आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करावे. या अधिवेशनात कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या सद्यपरिस्थितीवर चर्चा व्हावी, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
देशात सध्या तरी लॉकडाऊनची परिस्थिती नाही! – अमित शहा
देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकार घाईघाईने घेणार नाही, तुर्तास घाईघाईने लॉकडाऊन करावे, अशी परिस्थिती नाही. कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड आहे, पण या विषाणूवर आपण नक्की विजय मिळवू, असा विश्वास गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. गेल्यावर्षी लॉकडाऊन लावला तेव्हा उद्देश वेगळा होता. त्यावेळी आमच्याकडे कोणतेही औषध किंवा लस नव्हती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. केंद्र सरकार तत्पर नाही, असे नव्हे. आम्ही सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहोत, दोन बैठकाही झाल्या आहेत. त्यावेळी मीदेखील हजर होता. सर्वांच्या सहमतीने जे ठरेल त्याला अनुसरूनच आम्ही पुढे जाणार आहोत. परंतु, घाईगडबडीने देशभर लॉकडाऊन लागू करावे, अशी परिस्थिती सध्या दिसत नाही, असे शहा यांनी म्हटले. लसीकरणासंदर्भात वैज्ञानिकांशीही चर्चा सुरू आहे. कोरोनाशी लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. कोरोना संक्रमण प्रसाराचा वेग प्रचंड असल्याने लढा देणे थोडे कठीण आहे. पण, मला विश्वास आहे की, आपण त्यावर विजय मिळवू, असेही शहा म्हणाले.
(हेही वाचा : मुंबई पोलिसांनी एफडीएवर फोडले ‘खापर’! काय आहे पोलिसांचे म्हणणे? वाचा…)
Join Our WhatsApp Community