वाईन विक्रीच्या निर्णयावरून आता विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांच्या कुटुंबियांची वाईन व्यावसायिकांबरोबर पार्टनरशीप असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
काय म्हटले सोमय्या
रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी राऊतांवर निशाणा साधला. ते म्हणाले, राऊतांच्या परिवाराने काही महिन्यांपूर्वी एका वाईन व्यावसायिकासोबत बिझनेस पार्टनरशीप केली. त्यांनी जाहीर करावं की त्यांची पत्नी, त्यांची कन्या यांच्या नावावर किती पार्टनरशीप आहे शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांनी वाईन उद्योगात मोठी गुंतवणूक केली असून त्यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी एका वाईन वितरणाचा व्यवसाय असलेल्या कंपनीत भागीदार आहे.
सोमय्या पुढे म्हणाले की, मॅगपी ग्लोबल लिमिटेड या अशोक गर्ग यांच्या कंपनीसोबत राऊत यांची पार्टनरशीप आहे. संजय राऊत परिवाराने 16 एप्रिल 2021 मध्ये उद्योजक अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली. यानंतर 12 जानेवारी 2022 रोजी अशोक गर्ग यांच्या कंपनीने आपले नाव आणि व्यवसायाचे स्वरुप बदलत असल्याची माहिती मंत्रालयाला दिली आहे. या कंपनीचे नाव पूर्वी मादक होते. यानंतर या कंपनीचे नाव बदलून मॅगपी, असे ठेवण्यात आले आहे.
(हेही वाचा – …आणि मॉकड्रीलमध्येच अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक)
आणखी एका व्यवसायाचे तपशील जाहीर करणार
यावेळी सोमय्या यांनी असाही दावा केला की, अशोक गर्ग हे 2010 पासून दोन कंपन्या चालवत आहेत. यापैकी एक कंपनी वाईन वितरणाचा व्यवसाय करते. मुंबई, पुण्यातील हॉटेल्स, क्लब आणि पबमध्ये अशोक गर्ग यांच्या कंपनीकडून वाईन पुरवली जाते. या व्यवसायात अशोक गर्ग यांच्या कंपनीची एकाधिकारशाही आहे. अशोक गर्ग यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल साधारण 100 कोटी इतकी आहे. 16 एप्रिल 2021 रोजी संजय राऊत यांनी अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली. त्यांची मुलगी विधिता आणि पूर्वशी राऊत या दोघीही कंपनीत भागीदार आहेत. राऊत यांनी आपल्या हितसंबंधांची माहिती जाहीर करायला हवी होती, येत्या काही दिवसांमध्ये मी लवकरच संजय राऊत यांच्या आणखी एका व्यवसायाचे तपशील जाहीर करणार आहे.