शिवसेना कोणाची यावरून राज्यात वाद सुरू असताना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या वादात निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री शिवसेनेचे पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नावही गोठवले. यानंतर दोन्ही गट आक्रमक होत त्यांनी आरोप-प्रत्यारोप केले. मात्र यादरम्यान पुढील कायदेशीर बाबींची पूर्तताही करण्यात येत आहे. अशातच राजकीय वर्तुळातून मोठ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. आज, सोमवारी शिवसेनेचे खासदार आणि सध्या कोठडीत असलेले संजय राऊत यांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचा – धनुष्यबाण गोठवल्यानंतर ठाकरेंवर अमृता फडणवीसांचा निशाणा, दिले ‘हे’ ४ खोचक पर्याय)
काय म्हणाले संजय राऊत
राऊतांना न्यायालयात नेत असताना आजूबाजूला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी शिवसैनिकांनी त्यांनी पक्षाचे चिन्ह गोठवल्यासंदर्भात विचारले असता राऊत म्हणाले, चिन्ह गेल्याची ही पहिलीच वेळ नाही. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधीही अशाच परिस्थितीतून पुढे गेल्या होत्या. तीनवेळा त्यांचे चिन्ह बदलले होते. जनसंघालाही अशा परिस्थितीचा सामना करावा लागला. हे काही नवीन नाही. हे नवं चिन्ह शिवसेनेत नवी क्रांती घडवेल. नावात काय आहे, खरी शिवसेना कोणाची हे सगळ्यांना माहित आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, सोमवारी संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. त्यासाठी पोलीस राऊतांना न्यायालयाकडे घेऊन जात होते. त्यावेळी माध्यमांनी त्यांना सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीबाबत विचारले आणि चिन्ह गोठवण्यात आल्याबाबत देखील प्रतिक्रिया देण्याचा आग्रह केला. तेव्हा त्यांनी आपली प्रतिक्रिया देत शिवसेनेचे नवे चिन्ह क्रांती घडवून आणेल. आधी ज्या पक्षांची चिन्हे गोठवले गेली ते पक्ष मोठे झाले आहेत. आम्हीही मोठे होऊ, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community