अगदी पहाटेला सुरु झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला. तर शिवसेनेचे संजय राऊत अगदी हरता हरता वाचले. परंतु जिंकून आल्यावर राऊत यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन, आशीर्वाद घेण्याऐवजी सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. त्यामुळे राऊत यांची खरी निष्ठा कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे.
राऊतांचा काठावर विजय
राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे प्रतापगढी आणि शिवसेनेचे संजय राऊत हे विजयी झाले, तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना महाविकास आघाडीच्या कोट्यातील आमदार व अपक्षांच्या बळावर निवडून आणण्याचा दावा केला होता. परंतु संजय राऊत यांचाच काठावर विजय झाला आणि संजय पवार हे पराभूत झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली आहे.
(हेही वाचाः शिवसेनेचा खरा मित्र कोण? राज्यसभा निवडणुकीनंतर उपस्थित होतोय प्रश्न)
वर्षाआधी गाठले सिल्व्हर ओक
या निवडणुकीतील पराभवानंतर संजय राऊत यांनी संध्याकाळी सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आशीर्वाद घेतला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते असल्याने त्यांचे आशीर्वाद घेत निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. परंतु संजय राऊत हे शिवसेनेचे नेते असून, आपले पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची विजयानंतर भेट न घेता त्यांनी पवार यांची भेट घेतली. पवार यांची भेट घेतल्यानंतर राऊत हे वर्षा निवासस्थानी उध्दव ठाकरे यांना भेटण्यास गेले. त्यानंतर राऊत यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे नेते मंत्री अनिल परब, एकनाथ शिंदे यांच्यासह नेत्यांची बैठक बोलावली.
विशेष म्हणजे या निवडणूक निकालानंतर शरद पवार यांनी आपल्या या पराभवाबाबत धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीचेही कौतुक केले.
(हेही वाचाः …तरीही संजय राऊत काठावर पास)
Join Our WhatsApp Community