राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करायला चांगलाच वेग आला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीची उमेदवारी हा सध्या कळीचा मुद्दा ठरत आहे. संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात येईल, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी ठेवल्यामुळे आता या जागेच्या उमेदवारीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
यातच आता संजय राऊत मराठा संघटनांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले आहेत, त्यामुळे या भेटीत संभाजीराजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
(हेही वाचाः राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने केली संभाजीराजेंची कोंडी)
राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
शनिवारी सकाळी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत संभाजीराजे यांना राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी देण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर लगेचच राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या उमेदवारीचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव
राज्यसभा निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केले. सर्व पक्षांनी आपल्याला यासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पण त्यानंतर शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवार देण्याचे सांगण्यात आल्यानंतर संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांना उमेदवारी देण्यात येईल, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडून ठेवण्यात आला.
(हेही वाचाः संभाजीराजे मविआकडून अर्ज भरण्यास इच्छुक, पण मुख्यमंत्री म्हणतात…)
Join Our WhatsApp Community