मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. तर आता शिवसेनेकडून कोल्हापूरचे संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नाहीच हे निश्चित झाले आहे. यादरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना संभाजीराजेंच्या उमेदवारीवर पूर्णविराम दिल्याचे समजतेय. संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीविषयी विचारले असता संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना “आमच्यासाठी तो विषय संपला आहे”, असे म्हणत सुरू असलेल्या या मुद्द्यावर पडदा टाकल्याचे पाहायला मिळत आहे.
(हेही वाचा – अमेरिकेच्या शाळेत अंदाधुंद गोळीबार, 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू)
काय म्हणाले राऊत
शिवसेनेच्या एका जागेवर राज्यसभेत उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी भूमिका पक्षाकडून घेण्यात आली होती. मात्र संभाजीराजे यांनी त्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला. त्यामुळे शिवसेनेने कोल्हापूर मधील दुसऱ्या नेत्याला उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यावरून आता तर्कवितर्कांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच या चर्चांना स्वतः संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. यावेळी राऊत म्हणाले की, आमच्याकडून संभाजीराजेंचा विषय संपला आहे. मराठा संघटना संजय राऊत आणि शिवसेनेला हे महागात पडेल अशा धमक्या देत आहे. पण संजय राऊतांचा या गोष्टींशी व्यक्तिगत संबंध काय? शिवसेनेचा तरी काय संबंध? जे अशा धमक्या देत आहेत, त्यांनी मागच्या काही दिवसांतल्या घडामोडींचा अभ्यास करावा, असेही ते म्हणाले.
मराठा क्रांती मोर्चाकडून सेनेविरोधात नाराजी
दरम्यान, छत्रपती यांच्या अपक्ष उमेदवारीला संजय राऊत सातत्याने विरोध करताना दिसत आहेत. एकीकडे प्रियंका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना कोणत्याही प्रकारच्या अटी शर्थी न घालता राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दाखवता आणि ज्या छत्रपतींच्या नावावरती एवढं वर्ष राजकारण करत आहेत, सत्ता भोगत आहेत त्यांनाच विरोध करता, असे म्हणत मराठा क्रांती मोर्चाकडून शिवसेनेविरोधात नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community