ईडीचे पथक आज पहाटे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना कार्यालयात घेऊन गेले असून त्याची सध्या चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे पथक आज पहाटे ५ वाजता नवाब मलिकांच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि त्यांना ते कार्यालयात घेऊन गेले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी नवाब मलिकांची चौकशी करत आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनेक लोकांवर अशा पद्धतीचे आरोप केले, ज्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. मग त्यांना समन्स का नाही. त्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा का नाही? त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकलंय का?, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
(हेही वाचा – राऊतांच्या ‘त्या’ विधानाकडे पवारांनी केले दुर्लक्ष)
काय म्हणाले राऊत
नवाब मलिकांच्या ईडी चौकशीबाबत प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, किरीट सोमय्यांनी भाजपच्या नेत्यांची काही प्रकरणे ईडीकडे दिलेली आहेत, आज जे भाजप मंत्री आहेत, पदावर आहेत, केंद्रीय मंत्री आहेत. त्यांची अनेक प्रकरणे भ्रष्टाचारविरुद्ध लढणारे महात्मा (किरीट सोमय्या) म्हणजे त्यांना हा शब्द योग्य आहे. मी त्यांना काहीही बोललो तरी त्यांना शिवी दिली असे वाटते. या महात्माने ईडीने अनेकांची प्रकरणे दिली आहेत. त्यांना समन्स का गेला नाही, त्यांच्या घरी ईडी का नाही पोहोचली. आता आम्ही ही सगळी प्रकरणे परत एकदा ईडीकडे घेऊन जाणार आहे. तक्रार कशी करायची हे आम्हाला माहित आहे. ज्या तक्रारी आधी केलेल्या आहेत, त्याचं काय झालं? का ते समन्स आणि ईडीची पथक फक्त महाविकास आघाडी, तृणमूल काँग्रेस किंवा अखिलेश यादव यांचा पक्ष, लालू यादव यांचा पक्ष यांच्यापूरती मर्यादित आहे की त्यांच्यासाठी सर्व केंद्रीय तपास यंत्रणांची रचना आणि नियुक्ती झालेली आहे. २०२४ पर्यंत हे सर्व चालेल. २०२४ नंतर ते आणि आम्ही आहोत. याचा तुम्ही काही अर्थ काढा.
राऊतांनी दिला इशारा
या पुढे राऊत असेही म्हणाले की, भाजप विरोधक आहेत किंवा जे सत्य बोलतायत त्यांच्याच मागे या तपास यंत्रणा एखाद्या माफिया टोळी प्रमाणे लावल्या जातात. पण आम्ही घाबरत नाही, ही लढाई चालू राहिल. त्यांना येऊन द्या, तपास करून द्या कितीही खोटं, बनावटं करू द्या. शेवटी सत्याचा विजय या देशामध्ये होत असतो. प्रत्येक गोष्टीवर आमचं लक्ष आहे. आता मुख्यमंत्र्यांसोबत बोलण झाले आणि अनेक विषयांवरती चौकशी झाली. हे सोपं नाही. २०२४ नंतर ज्या गोष्टी घडणार आहेत, त्याची तयारी तपास यंत्रणेने ठेवावी, असा इशारा राऊतांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community