संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर गुरुवारी संजय राऊत यांचे मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करत शिवसैनिकांनी शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. पण शरद पवार आणि संजय राऊत यांच्या संबंधांबाबत राऊतांना विचारले असता त्यांनी धक्कादायक विधान केले आहे. मी शिवसेनेत असताना सुद्धा माझे आणि पवारांचे संबंध चांगले होते, असे विधान राऊत यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे संजय राऊत यांनी शिवसेना सोडली का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मी शिवसेनेत असताना सुद्धा…
भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत हे शरद पवार यांचे माणूस असल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप केला होता. त्यावर राऊत यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. मी शरद पवार यांचा माणूस आहे हे लपून राहिलंय का?, मी शिवसेनेत असताना सुद्धा माझे आणि शरद पवार यांचे घनिष्ट आणि प्रेमाचे संबंध आहेत, त्यामुळेच आम्ही राज्यात महाविकास आघाडी सरकार आणू शकलो, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थ आता काढण्यात येत आहेत.
(हेही वाचाः ‘मी शरद पवारांचा माणूस आहे’, संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं)
मी शंभर खून केले
यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपांवर देखील जोरदार भाष्य केलं. माझ्यावरील आरोपांपेक्षा मी विचारत असलेल्या प्रश्नांची भाजपने उत्तरे द्यावीत. त्यांच्या आरोपांचं काय सांगता मला, मी शंभर खून केले हे मी सांगतो आता बोला, असा धक्कादायक दावा राऊत यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community