शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर अनेकदा आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. पण संजय राऊत यांनी आता फडणवीस यांच्या मुख्यमंत्री होण्यावरुन भाष्य केलं आहे. जर फडणवीसांना अडीच वर्षांपूर्वी सद्बुद्धी आली असती तर कदाचित आजचं राज्यातलं चित्र वेगळं असतं, कदाचित फडणवीस आज मुख्यमंत्री असते, असं विधान राऊत यांनी केलं आहे.
तुम्हाला सद्बुद्धी का नाही मिळाली?
संजय राऊत यांची गुरुवारी नागपूर येथे सभा झाली. या सभेपूर्वी फडणवीस यांनी राऊतांवर टीका केली होती. नागपुरच्या मातीत आल्यानंतर अनेकांना सद्बुद्धी मिळते त्यामुळे राऊतांना देखील सद्बुद्धी मिळेल, असं फडणवीस म्हणाले होते. त्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. या मातीत नक्कीच चांगले गुण आहेत, त्या मातीने देशाला अनेक महान लोक दिले आहेत. त्यामुळे जर आम्हाला त्या मातीतून सद्बुद्धी मिळत असेल तर तुम्हाला का नाही मिळाली? ती जर अडीच वर्षांपूर्वी मिळाली असती तर या राज्यातलं राजकारण आज वेगळं असतं, कदाचित तुम्ही आज मुख्यमंत्री असता, असं विधान करत राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
(हेही वाचाः ‘राज तिलक की करो तैयारी…’, बॅनरबाजी करत मनसेने सेनेला डिवचलं!)
सद्बुद्धीचं अजीर्ण झालं
फडणवीस आणि भाजपला त्यावेळी आपल्या हिंदुत्ववादी मित्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याची सद्बुद्धी मिळाल्यामुळे त्यांच्यावर आज ही वेळ आली आहे. त्यावेळी त्यांना सद्बुद्धीचं अजीर्ण झालं त्यामुळे आज राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, असंही राऊत यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते फडणवीस?
नागपूरच्या मातीत एक वेगळेपण आहे. त्यामुळे नागपूरमध्ये कोणी वारंवार आलं की त्यांना सुबुद्धी येते. त्यामुळे राऊतांनाही ती सुबुद्धी येईल, असा अप्रत्यक्ष टोला फडणवीस यांनी लगावला होता.
(हेही वाचाः राज्यात लोड शेडिंगची घोषणा! कुठल्या भागात किती वेळ होणार ‘बत्ती गुल’?)
Join Our WhatsApp Community