तुमच्या फायद्यासाठी महाविकास आघाडी निर्माण केली हरकत नाही, पण म्हणून महाविकास आघाडीने शिवसेनेला संपवू नये, शिवसैनिकांना जगू द्यावे, अशा शब्दांत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाला गेल्यावर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महाविकासच्या पुण्यातील कारभाराविषयी बाेलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यात महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये आलबेल असल्याचे बोलले जाते मात्र याला पुणे जिल्हा अपवाद आहे. पुणे जिल्ह्यात शिवसेनेवर अन्याय होत आहे. आम्हाला आणि कार्यकर्त्यांना जगू द्या, पुणे जिल्ह्यातून शिवसेना संपविण्याचं काम सुरु असल्याची खंत व्यक्त शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी व्यक्त केली आहे.
(हेही वाचा मध्य रेल्वेने प्रवास करताय, तर आठवडाभर घरातून लवकर निघा! कारण…)
बैलगाडी शर्यत डाेळ्यात खुपली
आढळराव पाटील म्हणाले अडीच वर्षात मला खूप वाईट अनुभव आले आहेत. खेडच्या पंचायत समितीच्या सभापतीस सहा महिने जेलमध्ये रहावे लागले. हे सत्ताधा-यांच्यामुळे झाले. आम्ही बैलगाडी शर्यत भरवली. ती डाेळ्यात खूपली आणि त्याची परवानगी नाकारली. हे कारस्थान जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील विराेधकांनी केले. आम्हाला संपविण्याचा डाव रचला जात आहे. आमच्या नादी लागू नका असा इशारा आढळराव पाटील यांनी देतानाच आम्ही महाआघाडीचे सूत्र पाळत आहाेत. परंतु आमचे अस्तित्व राहू द्या असेही त्यांनी व्यक्त केले.
याआधी कुणी व्यक्त केलेली नाराजी?
याआधीच शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी महविकास आघाडीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेला नुकसान केले जात आहे, असे म्हटले होते. या याआधी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपशी फारकत घेऊन सेनेचे नुकसान होत आहे. महाविकास आघाडीचा अन्य पक्षांनाच फायदा होत आहे, असे म्हटले होते. तर शिवसेना नेते रामदास कदम यांनी, ‘राष्ट्रवादी शिवसेनेचे मतदार संघ गिळंकृत करत आहे’, असा आरोप केला होता.
Join Our WhatsApp Community