सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. पण या उद्घाटनाच्या कार्यक्रमाआधीच आता राजकीय विमानं उंच उडायला लागली आहेत. त्यामुळे सध्या या राजकारणाचीच हवा राज्यात जास्त आहे.
विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव तिस-या स्थानी असल्याने, यावरुन राजकारण होत असल्याचे राणे समर्थकांचे म्हणणे आहे, तसेच खुद्द नारायण राणेही नाराज असल्याचे बोलले जात आहे. आता यावरुनच शिवसेनेने राणेंचा समाचार घेतला आहे. शासकीय प्रोटोकॉलनुसार निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली असून,कोणी त्यांच्या स्थानावरुन रणकंदन करतील तर ते त्यांचे अज्ञान आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे.
(हेही वाचाः चिपीवरुन काहीच दिवसांत उडणार विमान! किती आहे तिकीट?)
त्यांनी चांगला गुरू करावा
हा कार्याक्रम राज्यात होणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रोटोकॉलनुसार हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये प्रत्येकाचे स्थान ठरलेले आहे. त्यामुळे तिस-या क्रमांकाचे स्थान दिल्याने कोणी उहापोह करत असतील तर ते त्यांचे अज्ञान आहे. त्यांना नेमकं कळत नाही की शासनाचा प्रोटोकॉल काय आहे, त्यांनी चांगला गुरू करावा म्हणजे त्यांना चांगले मार्गदर्शन मिळेल, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी राणेंना लगावला आहे.
सगळ्यांचे योग्य मान सन्मान होणार
विमानतळाचा उद्घाटन कार्यक्रम हा कुत्सित हेतूने करण्यात येणार नाही. कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचा मान सन्मान हा प्रटोकॉलनुसार करण्यात येईल. त्यामुळे ज्यांना बोलावले आहे त्यांचा योग्य तो आदर सत्कार महाराष्ट्र सरकार करेल, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. तसेच आम्हाला विमानतळाचे श्रेय घ्यायचे नाही कारण ते आमचे कर्तव्य आहे, असाही खोचक टोमणा विनायक राऊत यांनी मारला आहे.
(हेही वाचाः चिपीचे उद्घाटन : मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर, राणे मात्र तिसऱ्या स्थानी!)
प्रोटोकॉल की राणेंना चपराक?
या कार्यक्रम पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचे नाव सर्वात वर आहे. त्यानंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे नाव हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. या आधी राणेंनी चिपीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आलेच पाहिजे, असे काही नाही असे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर हा प्रोटोकॉल म्हणजे राणेंसाठी चपराक असल्याचे मानले जात आहे. याआधी नारायण राणे या विमानतळाच्या उद्घाटनावरून आरोप प्रत्यारोप सुरु केले होते. हे विमानतळ शिवसेनेच्या प्रयत्नाने नव्हे तर आपल्याच प्रयत्नाने उभे राहिले आहे, असा दावा राणे यांनी केला होता. तसेच या मुद्द्यावरून आमदार नितेश राणे यांनीही शिवसेना पक्षाला टार्गेट केले होते. तर शिवसेनेचे नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी हे विमानतळ महाराष्ट्राच्या मालकीचे आहे, त्यामुळे मुख्यमंत्री हे यजमान असतील, अन्य पाहुणे म्हणून येतील, असे म्हणाले होते.
(हेही वाचाः चिपी विमानतळ उद्घाटन : राणेंचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरील विरोध का मावळला? )
Join Our WhatsApp Community