केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. त्यानंतर मंगळवारी, २१ फेब्रुवारी रोजी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकमताने पक्षाचा प्रमुख नेता म्हणून जाहीर करण्यात आले. या बैठकीत ठराव संमत करण्यात आले. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असा ठराव शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी मांडला. त्यामुळे आता या मागणीला राजकीय पाठबळ मिळाले असून शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मागणीचा पाठपुरावा केंद्राकडे केला जाईल, असेही या बैठकीत ठरेल.
मूळ शिवसेनेचा ताबा एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची पहिली बैठक ताज प्रेसिडन्सिमध्ये पार पडली. या बैठकीला शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, रामदास कदम, प्रतापराव जाधव, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, यांच्यासह शिवसेनेचे आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. शिवसेना पक्षाच्या घटनेवर देखील यावेळी चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे सिद्धेश रामदास कदम यांची शिवसेना सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे.
(हेही वाचा गड-दुर्गांचे संवर्धन, त्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी ३ मार्चला राज्यव्यापी मोर्चा)
बैठकीतील ठराव
- वीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा ठराव गजानन कीर्तिकर यांनी मांडला
- पक्षात शिस्त रहावी यासाठी, शिस्तभंग समितीची स्थापना, समितीच्या अध्यक्ष पदी मंत्री दादा भुसे, सदस्य पदी शंभूराज देसाई आणि संजय मोरे यांची निवड
- संघटनात्मक वाटचालीसाठी निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करणार
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात ठराव
- भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के प्राधान्य
- स्पर्धा परीक्षांसाठी गावागावात प्रशिक्षण वर्ग स्थापन करणार
- शिवसेना यापुढे युती करताना बाळासाहेबांनी आखून दिलेल्या विचारांवर कायम राहील, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही गड-किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करणार
- वीरमाता जिजाऊ, आहिल्याबाई होळकर, छत्रपती संभाजी महाराज यांना राष्ट्रपुरुषांच्या यादीत स्थान देणार