एकनाथ शिंदे माध्यामातून शिवसेनेने आतापर्यंतच्या इतिहासातले सर्वात मोठे बंड अनुभवले आहे. त्यामुळे आता पक्षसंघटना मजबुत करणं, मुळापासून पुन्हा एकदा उभारील घेणं गरजेचे आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिका-यांकडून एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र घेण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेचे आमदार, खासदार, शाखाप्रमुख तसेच विभाग अध्यक्ष या सर्व पदाधिका-यांकडून एक प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. या पत्राद्वारे पदाधिका-यांना आपली निष्ठा शिवसेनेच्या नेतृत्त्वावर, बाळासाहेबांच्या विचारांवर तसेच, उद्धव ठाकरेंवर आहे, अशी प्रतिज्ञा आता त्यांना शिवसेना भवनात दाखल करावी लागणार आहे. त्याबाबतचा मजकूर सर्वांना देण्यात आला आहे. त्यावर संबंधित पदाधिका-यांची सही असणं बंधनकारक आहे.
काय आहे प्रतिज्ञा
मी शपथ घेतो की,
शिवसेनेच्या घटनेवर पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा आहे.
बाळासाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शांवर पूर्ण निष्ठा आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असून, त्यांना बिनशर्त पाठिंबा आहे.
उद्धव ठाकरेंच्या प्रति असलेल्या निष्ठेची पुन:श्च पुष्टी करत आहे.
शिवसेनेच्या घटनेतील उद्धीष्ट पूर्ण करण्यासाठी सदैव कार्यरत असेन.
( हेही वाचा: उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मनी लाॅंड्रींग प्रकरणात मोठा दिलासा )
मनसेची टीका
आता शिवसैनिक कोण याची व्याख्या करण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत ते खरे शिवसैनिक की ज्यांनी हे विचार सोडले तो खरा शिवसैनिक. याचा निर्णय केवळ शिवसेनेत असणारे कट्टर शिवसैनिकच घेऊ शकतात, असे मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.
तसेच, शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यावर प्रतिक्रिया देताना, देशपांडे म्हणाले की आधी शिवबंधन बांधून घेतले. आता काय तर प्रतिज्ञापत्र. पण मी विचारतो की उद्या जर का शिवसैनिकांनी पक्षप्रमुखांकडूनच प्रतिज्ञापत्र मागितले की तुम्ही आधी प्रतिज्ञापत्र द्या की तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाचे विचार सोडणार नाहीत. तर हे प्रतिज्ञापत्र पक्षप्रमुखांकडून देण्यात येईल का? हा मोठा प्रश्न आहे, असे म्हणत देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
Join Our WhatsApp Community