मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकवण्याचा पण करणाऱ्या शिवसेनेने आता भाजपच्या विकासकामांचा धसका घेतला आहे. त्यामुळे विविध भागांमध्ये शिवसेना आमदार असलेल्या विभागांमध्ये भाजप नगरसेवकांची कामे प्रशासनाला हाताशी धरून रोखली जात असल्याचा आरोप होत असतानाच मालाडमध्ये भाजपचे महापालिका पक्षनेते विनोद मिश्रा यांनी प्रभागातील अशाच प्रकारे उद्यानाच्या विकासाचे काम करण्यात प्रशासनाकडून होणाऱ्या वेळकाढू धोरणाचा निषेध करण्यासाठी त्यांनी विभाग कार्यालयाबाहेरच ठिय्या मारला.
विकासकामे रखडवण्याचा डाव
कुरार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव व उद्यान सुशोभीकरणासाठी निधी मंजूर होऊनही विकासकामांना सुरुवात करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. ही विकासकामे रखडवण्याचा डाव महापालिकेतील सत्ताधारी पक्ष प्रशासनाला हाताशी धरून करत असून अशा मनोवृत्तीच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी पी- उत्तर कार्यालयाचे सहाय्यक आयुक्तांच्या दालनासमोर धरणे आंदोलन केले.
( हेही वाचा : ठाकरे सरकार कोळी, आगरी बांधवांना उद्ध्वस्त करतेय! )
भाजपने दिला आंदोनाचा इशारा
मागील ५ वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव, उद्यान सुशोभीकरणाच्या विकासकामांकरिता निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर काही दिवसांपूर्वी हा निधी मंजूर झाला आहे. तलाव, उद्यान विकास कामांकरिता आवश्यक ती सर्व प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे. असे असतानाही विकास कामांच्या निविदा काढल्या जात नाही. कामे पूर्ण होऊ नयेत म्हणून त्याजागी म्हाडाला चुकीच्या ठिकाणी शौचालय उभारणीसाठी परवानगी देण्यात आली. त्याकरिता अनेक झाडेही कापण्यात आली. तसेच पदपथावरही पक्के बांधकाम करण्यात आले आहे. याबाबत वारंवार सूचना करूनही कार्यकारी अभियंता यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी नागरिकांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सत्ताधारी शिवसेनेच्या दबावापोटी कुरारवासियांना अत्यंत चांगल्या पद्धतीच्या उद्यान विषयक सोयीसुविधा मिळू नयेत यासाठी जाणीवपूर्वक दबाव आणला जात असल्याचा आरोप विनोद मिश्रा यांनी केला आहे. त्यामुळे या विरोधात भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही मिश्रा यांनी दिला.
Join Our WhatsApp Community