राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीमध्ये राहणार, असे बोलून जरी अजित पवारांनी या चर्चांणा पूर्णविराम दिला असला तरीही अजूनही या चर्चा सुरू आहेत. अशातच आता शिवसेनेच्या (Shivsena) नेत्याने १ मेच्या मविआच्या वज्रमूठ सभेत अजित पवारांना खुर्ची नसणार, ते लवकरच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार, असा दावा केला आहे.
‘अजित पवार दबणारा माणूस नाही’
एका मराठी खासगी वृत्तवाहिनी बोलताना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले की, अजित पवार हे मोठे नेते आहेत. तसेच ते मेहनती आहेत. ते स्पष्टपणे बोलतात, कोणाचीही भीडभाड ठेवत नाहीत. काम व्हायचे असेल तर हो करतो, मग ते तातडीने करतात. आणि जर नाही व्हायचे असेल तर होणार नाही. ही जी धमक आहे, ती अजित पवारांमध्ये आहे. त्यांच्या या कार्यशैलीचा काही लोकांना त्रास होतोय. आणि म्हणून ते जास्त मोठे होऊ नये यासाठी षडयंत्र रचून त्यांना कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अजित पवार (Ajit Pawar) दबणारा माणूस नाही. पक्ष कोणता असो, काय कसे असो, अजित पवार स्वतःचे वर्चस्व निर्माण करणारा एक नेता आहे.’
(हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीच्या सुट्टीवर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण)
‘जास्त काळ अजित पवार (Ajit Pawar) या आघाडीत राहणार नाही’
‘१ मेच्या मविआच्या वज्रमूठ सभेत अजित पवार (Ajit Pawar) यांना खुर्ची सुद्धा नसणार आहे. दरम्यान कार्यकारणी बैठकीच्या पत्रिकेत अजित पवारांचे नाव नाही, कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून त्यांचे नाव नाही, हा जो प्रकार आहे, तो अजित पवारांनी आमच्यापासून दूर व्हावे, हा यांनी केलेला जाणूनबुजून पूर्व प्रकार आहे. पण एक माणूस आहे, कितीपर्यंत सहन करेल. मग त्याला वाटेल मी पण माझे बघून घेईन. असे जर अजित पवारांनी म्हटले, तर त्यात काही गैर नाही. त्यामुळे मला असे वाटत जास्त काळ अजित पवार (Ajit Pawar) या आघाडीत राहणार नाही. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. एवढे मात्र निश्चित आहे,’ असे संजय शिरसाट म्हणाले.
Join Our WhatsApp Community