ठाकरे सरकार राणेंच्या जुन्या फाईल उघडणार

223

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना राणे पिता-पुत्रांनी थेट या प्रकरणात आदित्या ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरु केल्यानंतर आता शिवसेना देखील आक्रमक झाली असून, राणेंच्या जुन्या फाईल उघडून नारायण राणेंना अडचणीत आणण्याची रणनीती शिवसेनेने आखालया सुरुवात केली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र देऊन, २००२ ते २०१३ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडलेल्या सर्व गुन्ह्यांचा पुर्नतपास करावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

राऊतांचे गृहमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये यापूर्वी सन २००२ ते सन २०१३ या कालावधीमध्ये अनेक राजकीय अथवा वैयक्तिक स्वार्थ बुदधीने केलेल्या मनुष्यवधाच्या घटना घडलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील तत्कालिन सरकारमध्ये सामील असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हयातील सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थी हेतूंमुळे अथवा राजकीय व्देषातून किंवा आशिर्वादाने सदर घटना घडवून आणल्या गेलेल्या असल्यामुळे सदर घटनांचा तपास दबावापोटी योग्य पध्दतीने झालेला नाही. सर्व गुन्हयांमध्ये हितसंबंध असलेल्या राजकीय व्यक्ती तत्कालीन सत्तेमध्ये असल्यामुळे काही गुन्हयामध्ये बनावट आरोपी उभे करून तकलादू तपास करण्यात आला तर काही गुन्हयामध्ये आरोपी सापडत नाहीत हे कारण दाखवून सर्व प्रकरणे दप्तरबंद केली गेलीत. त्यामुळे खऱ्या आरोपींना अटक व शिक्षा होऊ शकलेली नसून, खुनासारखे गंभीर गुन्हे केलेले आरोपी अद्यापही समाजामध्ये मोकाट फिरत आहेत. अशा गुंड प्रवृत्ती असलेल्या राजकीय व्यक्तींना कायद्याची जरब न बसल्यामुळे त्यांच्या हातून पुन्हा समाज विघातक घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व गुन्हयांचा पुनर्तपास उच्च स्तरीय पोलीस यंत्रणेमार्फत करण्याचे आदेश व्हावेत असे राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

या गुन्ह्यांचा पुर्नतपास करा 

सत्यविजय श्रीधर भिसे हत्या प्रकरण, रमेश नारायण गोवेकर बेपत्ता प्रकरण,अंकुश राणे हत्या प्रकरण, आणि रमेश शंकर मणचेकर हत्या प्रकरण या सर्व हत्या प्रकरणाचा पुर्नतपास करावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे. 2002 साली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांची हत्या करण्यात आली. कणकवलीपासून 15 किलोमीटर अंतरावरच्या शिवडावमध्ये ही हत्या झाली. नारायण राणे तेव्हा विरोधी पक्षनेते होते. या हत्येनंतर राणेंच्या कणकवलीतल्या घराची जाळपोळ झाली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.