एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी स्वतंत्र चूल मांडल्यामुळे शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ १५ वर आले. त्यामुळे ना सत्ता, ना विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद, अशी उद्धव सेनेची अवस्था झाली आहे. अशात आधीच पक्षाला घरघर लागली असताना, आहेत त्या पदाधिकाऱ्यांची अस्वस्थता दूर करण्यासाठी किमान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद हाती लागावे, यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा संख्याबळ अधिक असल्याने हे पद आपल्यालाच मिळावे, यासाठी शिवसेनेकडून आग्रह धरला जात आहे.
( हेही वाचा : पाणी आणि पथदिवे योजनांचा वीजपुरवठा सुरळीत होणार, थकित देयके शासन टप्प्याटप्प्याने भरणार)
सध्याच्या संख्याबळानुसार, विधान परिषदेत भाजपचे सर्वाधिक २४ सदस्य आहेत. त्या खालोखाल शिवसेना २२, राष्ट्रवादी १० आणि कॉंग्रेसचे १० सदस्य आहेत. महाविकास आघाडीतील घटकपक्षांत शिवसेनेची सदस्यसंख्या अधिक आहे. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळाल्यामुळे वरच्या सभागृहात शिवसेनेला हा मान मिळावा, अशी आग्रही मागणी सेना नेत्यांकडून केली जात आहे. शिवसेनेत या पदासाठी जोरदार लॉबिंगही सुरू झाले आहे. माजी मंत्री अनिल परब आणि सचिन अहिर यांची नावे या स्पर्धेत आघाडीवर आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर चेहऱ्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. परब यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप पाहता, अहिर यांचे पारडे जड आहे. आदित्य ठाकरे यांचा पुढील विधानसभेचा मार्ग सोपा करण्यासह यामिनी जाधव यांच्या भायखळ्यातील वर्चस्वाला धक्का देण्याची संधी यानिमित्ताने मिळू शकते.
शिवसेनेचा ग्रामीण चेहरा अशी ओळख असलेले अंबादास दानवे, हेही या पदासाठी इच्छुक आहेत. नामांतराचा मुद्दा हाती घेऊन औरंगाबादेत शिवसेना पुन्हा बळकट करायची झाल्यास दानवे यांना मोठी संधी देण्याची गरज आहे. यानिमित्ताने ती पूर्ण करता येऊ शकेल. पण, छप्पर गळत असताना, जमीन खोदण्याचा धोका उद्धव ठाकरे पत्करतील, असे चित्र सध्या तरी नाही. त्यामुळे मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर चेहऱ्याला हे पद दिले जाईल, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादीचाही दावा
विधान परिषदेत सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज आहे. राष्ट्रवादीकडे एकनाथ खडसेंसारखे सरकारला धारेवर धरू शकणारे अनुभवी नेते आहेत. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही आम्हालाच मिळावे, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. त्यामुळे येत्या काळात विधान परिषदेच्या पक्षनेते पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच पहायला मिळणार आहे.
विधान परिषदेतील संख्याबळ
- भाजप – २४
- शिवसेना – १२
- राष्ट्रवादी – १०
- कॉंग्रेस – १०