महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी गेल्या आठवड्यात संपली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. न्यायालयात दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आल्यामुळे हा निकाल नेमका कसा असेल, कोणाच्या बाजूने निकाल लागेल याबाबत राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगल्या आहेत. यावर एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या नेत्यांकडून निकाल आपल्याच बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
( हेही वाचा : झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…)
काय म्हणाले प्रतापराव जाधव ?
शिवसेनेचे नेते व बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मोठे विधान केले आहे. “न्यायालयाकडून काहीही निर्णय आला तरी, आम्ही त्या निर्णयाचा सन्मान करू ठाकरे गटाप्रमाणे आम्ही न्यायालय विकलं गेलंय असं केव्हाचं म्हणणार नाही” असे वक्तव्य खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले, “आम्ही न्यायालयात अनेक पुरावे आणि कागदपत्रे दिली आहेच. आमचे वकील हरिश साळवे, नीरज कौल यांच्यासह सर्वच वकील मंडळींनी सक्षमपणे बाजू मांडली. त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा आम्हाला विश्वास आहे. शेवटी कोणाच्याही बाजूने निकाल लागला तरी आम्ही त्यांच्यासारखं न्यायालय विकलं गेलयं असं केव्हाच म्हणणार नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मानच करू” अशी प्रतिक्रिया खासदार प्रतापराव जाधव यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
Join Our WhatsApp Community