उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’वर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. सामनाने लेखी माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असे शेवाळे यांनी पाठवलेल्या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
( हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला या ५ व्या आणि ६व्या मार्गिकेसाठी धारावीतील महापालिकेची जागा)
खासदार राहुल शेवाळे यांचे कराचीत हॉटेल आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे, अशा आशयाचे वृत्त दैनिक सामनाने २९ डिसेंबर २०२२ रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रकाशित केले होते. शिवाय सामनाच्या संकेतस्थळावरही हे वृत्त दोन्ही भाषेत प्रकाशित करण्यात आले. त्याला शेवाळे यांनी हरकत घेतली आहे.
सामनाने छापलेले हे वृत्त तथ्यहीन असून, केवळ माझ्या अशिलाची बदनामी करण्याच्या हेतूने प्रकाशित करण्यात आले आहे. सामनासारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राने कोणतीही पुष्टी न करता असे बदनामीकारक आणि अत्यंत बेजबाबदार वृत्त प्रकाशित करणे, हे प्रसार माध्यमांच्या नीतिमत्तेला धरून नाही. त्यामुळे सामनाने याबाबत बिनशर्त लेखी माफी मागावी, अशी नोटीस राहुल शेवाळे यांच्या वतीने विधिज्ञ चित्रा साळुंखे यांनी पाठवली आहे.
संपादक आणि बातमीदारावर कारवाई
उपरोक्त प्रकरणात सामनाने १५ दिवसांत लेखी माफी मागावी. तसा माफीनामा, ज्या पानावर हे वृत्त छापून आले त्या पानावर आणि त्याच आकारात छापण्यात यावा. अन्यथा सामनाचे संपादक आणि बातमीदार यांच्यावर फौजदारी आणि कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community