पक्ष फुटल्यानंतर उपनेतेपदासाठी ठाण्यातील महिलेची शिवसेनेला झाली आठवण

127

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचा स्वतंत्र गट स्थापन करत राज्यात भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. शिवसेनेचा स्वतंत्र वेगळा गट करत या पक्षावर दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी शिवसेनेने आता ठाण्यात नव्याने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली. या नव्याने करण्यात येणाऱ्या संघटना बांधणीमध्ये ठाण्यातील महिला पदाधिकारी अनिता बिर्जे यांना उपनेत्या बनवण्यात आले आहे. परंतु महिलांमधून उपनेत्या बनलेल्या त्या शिवसेनेच्या ठाण्यातील पहिल्या उपनेत्या ठरल्या आहेत. आजवर शिवसेनेने मुंबईतील दोन महिला पदाधिकाऱ्यांना उपनेते बनवले होते, परंतु या दोन नंतर काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चर्तुवेदी आणि सुषमा अंधारे यांना उपनेत्या बनवले गेले. परंतु शिंदे यांच्यासह ठाण्यातील शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेला ठाण्यातील महिलेची आठवण झाली, असे बोलले जात आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना ‘धर्मवीर आनंद दिघे’ हा चित्रपट पाहून अनिता बिर्जे यांचा आठवण झाली का, अशी चर्चा सुरु आहे.

२९ उपनेत्यांमध्ये महिला पदाधिकारी उपनेत्यांची संख्या आता पाच

शिवसेनेत १२ नेते असून २९ उपनेते आहेत.  या १२ नेत्यांमध्ये एकाही महिलेचा समावेश नाही. तर २९ उपनेत्यांमध्ये चार उपनेत्यांचा समावेश आहे. ज्यातील डॉ. नीलम गोऱ्हे, विशाखा राऊत आणि मिना कांबळी या तीन महिला पदाधिकाऱ्यांचे उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. मागील अनेक वर्षांपासून या तीन महिला पदाधिकारीच उपनेत्या होत्या. त्यानंतर २०१९मध्ये काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेनेने उपनेते व प्रवक्ते बनवले. त्यानंतर आंबेडकर चळवळीतील नेत्या असलेल्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनाही उपनेत्या बनवण्यात आले. त्यामुळे एकूण २९ उपनेत्यांमध्ये महिला पदाधिकारी उपनेत्यांची संख्या आता पाच झाली आहे.

(हेही वाचा आता काही सेकंदात सिनेमा होणार डाऊनलोड, काय आहेत 5G इंटरनेटची वैशिष्ट्ये?)

ठाण्यातून उपनेत्या बनलेल्या त्या पहिल्या उपनेत्या

त्यातच रविवारी ठाण्यातील महिला पदाधिकारी अनिता बिर्जे यांना शिवसेनेने उपनेतेपदी नियुक्ती केली. आजवर ठाण्याचे दशरथ पाटील, कल्याणचे अल्ताफ शेख आदींना उपनेते बनवले आहे. परंतु या शिवाय कुणालाही उपनेते बनवले नाही. परंतु शिंदे यांच्यासोबत ठाण्यातील निम्म्यापेक्षा जास्त शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक गेल्याने शिवसेनेला आता जुन्या निष्ठावान शिवसैनिकांची आठवण झाली. शिवसेनेचे खासदार असलेल्या राजन विचारे यांनाही पक्षाने उपनेते पद बहाल केले नाही. परंतु शिंदे बाजुला होताच विचारेंच्या नेतृत्वाखाली ठाण्यात शिवसेनेला पुन्हा मजबूत करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आजवर शिवसेनेसोबत राहिलेल्या अनिता बिर्जे यांना उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्यातून उपनेत्या बनलेल्या त्या पहिल्या उपनेत्या आहेत. बाहेरुन आलेल्या चर्तुवेदी आणि अंधारे यांना उपनेता पद बहाल करणाऱ्या शिवसेनेला ठाण्यातील महिलेला उपनेता बनवण्यासाठी पक्ष फुटण्याची आणि नेते मंडळी सोडून जाण्याची वा़ट पहावी लागली, असे यावरून स्पष्ट दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.