प्रभाग फेररचनेत सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप

महापालिका आयुक्तांकडून परस्पर प्रभाग फेररचना केल्याचा संशय भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

121

मुंबईतील काही प्रभागांच्या रचनांमध्ये बदल करून त्यांच्या सिमा निश्चित करण्यात आल्या आहेत. याचा प्रारुप आराखडा मुंबई महापालिकेने सुधारणा करून राज्य निवडणूक विभागाला सादर केला आहे. हा प्रारुप सिमा बदलाचा आराखडा सादर करताना शिवसेनेने स्वत:ला जिंकता येणाऱ्या आणि भाजपचे मजबूत गड असलेल्या प्रभागांमध्ये जाणीवपूर्वक बदल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आमदारांनी राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांची भेट घेवूनच ही बाब निदर्शनास आणली आहे. महापालिका आयुक्तांच्या संदिग्ध भूमिकेमुळेच भाजपने राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली असून आता निवडणूक आयुक्तांची जबाबदारी अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.

राज्य निवडणूक आयुक्तच होते अनभिज्ञ

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्व़त्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही प्रभागांच्या रचनांबाबत आक्षेप नोंदवला गेल्याने त्यांची फेररचना करून त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार याच्या काही प्रभागांच्या रचनेत बदल करून मागील २१ ऑक्टोबर रोजी याचा प्रारुप आराखडा आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने हा प्रारुप प्रभाग फेररचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात पाठवण्यात आला होता. मात्र, महापालिकेकडून आलेल्या या प्रारुप आराखड्यांची कल्पना निवडणूक आयुक्तांना नव्हती. मात्र, भाजपचे शिष्टमंडळ भेटीला आल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनंतर आयुक्तांनी याची माहिती जाणून घेतली.

(हेही वाचा : महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी ‘गोड’)

आयुक्तांकडून परस्परच झाला बदल 

त्यामुळे महापालिकेच्या वतीने पाठवण्यात आलेल्या प्रारुप आराखड्याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार प्रभागांच्या सिमा या शिवसेनेने आपल्याला पाहिजे तशा बदलेल्या आहेत. यामध्ये भाजपला डॅमेज करून स्वत:चे प्रभाग अधिक मतांनी कशाप्रकारे निवडून येतील, याचा आढावा घेऊनच सुधारणा करण्यात आली आहे. याबाबतची कल्पना विभागातील सहायक करनिर्धारण संकलनापासून ते अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याबरोबर कुणालाही काही कल्पना नाही. आयुक्तांकडून परस्परच हा सर्व बदल झाल्याचा संशय भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

मुंबई भाजपकडून निषेध

महानगरपालिकेच्या प्रभाग परिसीमा बदलाचा मुंबई भाजप तीव्र निषेध व्यक्त करत असल्याचे भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सांगत या संदर्भात मुंबई भाजपा शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबईसह पश्चिम उपनगरातील प्रभाग परिसीमा बदलात सत्ताधारी पक्षाला फायदा व्हावा यासाठी हा प्रकार करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयुक्तांना सांगितले, असेही लोढा यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिकेने २४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निवेदनात सादर केलेली परिसीमा बदलाची माहिती आणि २६ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेले प्रभाग परिसीमा बदल यात तफावत आहे. यामुळे केवळ सत्‍ताधारी पक्षांचा फायदा होत असल्याचे चित्र समोर येत असल्याची शंका लोढा यांनी त्यावेळी व्यक्त केली. एका कॅबिनेट मंत्र्यांच्या देखरेखीखाली प्रभागाच्या परिसीमेमध्ये हस्तक्षेप केला जात असल्याची टिकाही लोढा यांनी केली

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.