एवढी वर्षे मुंबईची सत्ता भोगूनही सेनेची मुंबईकरांशी गद्दारी! आशिष शेलारांचा टोला 

16 वर्षांत सरासरी 20 हजार कोटींचा अर्थसंकल्प जरी गृहीत धरला, तरी 16 वर्षांत 3 लाख 20 हजार कोटींचा अर्थसंकल्पीय निधी मुंबईकरांसाठी खर्च केला. मात्र खर्च करून चित्र काय आहे? मग हे पैसे गेले कुठे?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला.

171

आज 26 जुलै दुर्दैवाने मुंबईकरांच्या कायमचा लक्षात राहणारा दिवस आहे. 26 जुलै 2005 च्या पुराला 16 वर्षे उलटूनही परिस्थिती काही बदलली नाही. एवढे वर्ष सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईकरांशी गद्दारी आणि फितुरी केली आहे. त्यामुळे मुंबईची स्थिती अशी आहे की, दरवर्षी निसर्गावर खापर आणि काही लोकांच्या घरावर सोन्याचे छप्पर, असा सनसनाटी टोला भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी हाणला.

16 वर्षांतील 3 लाख 20 हजार कोटी गेले कुठे? 

कोकण आणि साताऱ्यातील परिस्थिती पाहतोय. चिखलाचे डोंगर, मृत्यूचे थैमान हे पाहून मुंबईत शिवसेनेला काही करावे असे वाटत नाही. कधी 20 हजार, कधी 30 हजार, कधी 35 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला. 16 वर्षांत सरासरी 20 हजार कोटींचा अर्थसंकल्प जरी धरला तर 16 वर्षांत 3 लाख 20 हजार कोटीचा अर्थसंकल्पीय निधी खर्च मुंबईकरांसाठी केला. मात्र खर्च करून चित्र काय आहे? मग हे पैसे गेले कुठे? सत्ताधारी शिवसेनेला याचे उत्तर द्यावे लागेल, असे अँड आशिष शेलार म्हणाले. चितळे कमिटी, आयआयटीच्या अहवालाचे काय झाले? त्यावेळी चितळे समितीने ज्या शिफारशी केल्या होत्या त्याचे काय झाले?  मुंबईतले पानलोट क्षेत्र मोजले जात आहे का? मिठी नदीवरील अतिक्रमण हटवले का? पम्पिंग स्टेशनचे काय झाले? आयआयटी पवईचा अहवाल पाण्यात बहुदा भिजून गेला. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सत्ताधीशांना द्यावी लागणार आहेत. जनतेकडून शिवसेनेकडे हिशोब मागण्याचे काम भाजप करेल, असे अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

(हेही वाचा : १०० वर्षांत पहिल्यांदाच पडला इतका पाऊस! अजित पवारांनी महापुरामागील सांगितले कारण)

भाजपा नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देणार!

चिपळूण येथे पूरग्रस्त भागात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाहणी प्रसंगी एका पूरग्रस्त महिलेने पोटतिडिकीने आक्रोश करत खासदार, आमदारांचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्याचे आवाहन केले, त्याला प्रतिसाद देत भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त निधीस वर्ग करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी जाहीर केला व तसे लेखी पत्र महापौर आणि महापालिका चिटणीस यांना पाठवले आहे. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. त्यात मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भ, अमरावती, सांगली इत्यादी ठिकाणी कित्येक दिवस पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले. अनेक हातावर पोट असणाऱ्या कुटुंबीयांचे संपूर्ण आयुष्य उदध्वस्त झाले आहे. अशा प्रसंगी आपत्तीग्रस्त कुटुंबियांना उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे. पूरग्रस्त भागातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहेत. राज्यात कुठेही आपत्ती उद्भवल्यास  भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुनर्वसनासाठी तातडीने मदत पोहोचवण्यात येते. या पार्श्वभूमीवर तातडीने भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त निधीस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली. त्यासंबंधीचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना देण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.