शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता ठाकरे सरकारच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिंदेंनी पक्षाविरोधात बंड पुकारला तेव्हापासून राज्यात राजकीय नाट्य घडताना दिसत आहे. दरम्यान, अशातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसतेय. शिवसेना हा संघर्ष करणारा राजकीय पक्ष आहे. आमच्याकडे राखेतून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल. पण सत्ता परत मिळवता येईल. पक्षाची प्रतिष्ठा ही आमच्यासाठी सर्वोच्च आहे, असे बुधवारी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – सत्तेचा सस्पेन्स कायम, ठाकरे सरकार धोक्यात; शिंदे करणार स्वतंत्र गट स्थापन?)
“शिंदेंना पक्ष सोडणं सोपं नाही”
पुढे बोलताना राऊत असेही म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आम्ही सरकारमध्ये आहोत. बुधवारी सकाळी एकनाथ शिंदेंसोबत माझं बोलणं झालं. आमच्यात तासभर चर्चा झाली. आमचं फोनवर बोलणं झाल्याची कल्पना मी उद्धव ठाकरेंना दिली आहे. पक्षाकडून त्यांच्याशी संवाद सुरू आहे. शिंदे हे शिवसैनिक आहे. त्यांनी शिवसेनेचे काम केले असून शिंदेंना पक्ष सोडणं सोपं नाही आणि आम्हालाही त्यांना सोडणं सोप नाही, त्यांची नाराजी दूर होईल, सर्व आमदार परत येतील. एकनाथ शिंदेंचं बंड शांत होईल, असे म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
राखेतून गरूड झेप घेण्याची शिवसेनेची ताकद
पत्याच्या बंगल्याप्रमाणे सरकार कोसळेल असं भाजपला वाटत असेल पण शिवसेनेत राखेतून गरूड झेप घेण्याची ताकद आहे, असे राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे आणि आमदारांची नाराजी हा आमच्या घरातील विषय आहे. सर्व लोक पुन्हा आपल्या घरी येतील. एकनाथ शिंदे आणि इतर सहकाऱ्यांशी व्यवस्थित संवाद सुरु असल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले.