मुंबईतील शिवडी किल्ल्याची डागडुजी करत तेथील परिसर सुशोभित केल्यानंतर आता वरळी आणि माहिम किल्ल्याची डागडुजी आणि सुशोभिकरणाचे प्रस्ताव पुढे रेटले जात आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने या दोन्ही किल्ल्यांचे रंगरुप पालटवून टाकण्याचा प्रयत्न होत असला, तरी प्रत्यक्षात ज्या किल्ल्याच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झाली होती, त्या वांद्रे किल्ल्याच्या सुशोभिकरणाला चक्क शिवसेनेने खोडा घातला आहे.
महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने वांद्रे किल्ल्याच्या सुशोभिकरणाचा प्रस्ताव मंजूर न करता सर्व किल्ल्यांचे प्रस्ताव आणा, असे सांगत तो प्रस्ताव दप्तरी दाखल केला होता, परंतु दोन वर्षे उलटत आली, तरी त्यावर निर्णय घेतला जात नसून एकप्रकारे आशिष शेलार आमदार असल्याने सत्ताधारी पक्षाने हा राग काढला होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रस्ताव फेटाळला
वांद्रे पश्चिममधील स्थानिक भाजपचे आमदार व माजी शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी वांद्रे किल्ल्याची डागडुजी करून त्याला सुशोभित करण्याची मागणी केली होती. पर्यटनाच्यादृष्टीने या किल्ल्याचे सुशोभिकरण आवश्यक असल्याने शेलार यांच्या मागणीनुसार तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद केली होती. त्यानुसार महापालिका जानेवारी २०२० मध्ये, उद्यान कक्षाच्या माध्यमातून एच पश्चिम विभागातील वांद्रे किल्ल्याचे सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला होता. या सुशोभिकरणामध्ये किल्ल्याच्या मोडकळीस आलेल्या संरक्षक भिंती पाडून, त्या भिंतींची पुनर्बांधणी करणे, प्रवेशद्वार बनवणे, शहरी वने निर्माण करणे आदी कामे केली जाणार होती. या कामासाठी महापालिकेने कंत्राटदाराची निवड केली आहे. यासाठी एपीआय सिव्हीलकोन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवडही करण्यात आली होती. या कंपनीने विविध करांसह २०.६२ कोटीं रुपयांची बोली लावली होती. परंतु हा प्रस्ताव शीव, माहिम, वरळी आदी किल्ल्यांचे एकत्र प्रस्ताव सादर करावे असे कारण देत प्रस्ताव फेटाळत, फेरविचारासाठी परत पाठवला होता. परंतु दोन वर्षे उलटत आले तरी वांद्रे किल्ल्याच्या सुशोभिकरणाबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल केली जात नाही.
वांद्रे किल्ल्याबाबत निर्णय नाही
एका बाजूला पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या मतदार संघातील वरळी किल्ल्याला गतवैभव परत प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला आहे. वरळीबरोबरच शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचा विधानसभेतील माहिम किल्ल्याचेही सुशोभिकरण करण्यासाठी प्रस्ताव पुढे रेटला जात आहे. परंतु या दोन्ही किल्ल्यांचे प्रस्ताव पुढे रेटताना वांद्रे किल्ल्याच्या प्रस्ताव तयार असतानाही त्यावर प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाकडून कोणतही निर्णय घेताना दिसत नाही.
(हेही वाचा : विपश्यनेसाठी महापालिका कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची विशेष रजा! )
राजकीय सुडापोटी सुशोभिकरणाला विलंब
एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या किल्ल्याचे काम प्रथमपासून उद्यान कक्षाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून होत असेल, पण आपल्याकडे मात्र याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले. उद्यान कक्षाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी वांद्रे किल्ल्यांचा प्रस्ताव मंजुरीला पाठवला होता, परंतु तो फेरविचारासाठी पाठवण्यात आला. पण सध्या त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून माहिम आणि वरळी किल्ल्यांच्या सुशोभिकरणाची कामे विभागीय सहायक आयुक्तांच्या माध्यमातूनच केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वांद्रे किल्ल्याच्या सुशोभिकरणाचे कामही विभागीय सहायक आयुक्तांकडूनच केले जावू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे माहिम आणि वरळी किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी पुढाकार घेणारे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे केवळ राजकीय सुडापोटीच वांद्रे किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी कोणाताही पुढाकार घेत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. वांद्र्यात भाजपला शह देण्यासाठी वांद्रे किल्ल्याचा विकास न करता त्याला भकास स्थितीत राहिलेल्या किल्ल्याचे बकाल रुप पर्यटकांनी पहावे हीच सत्ताधारी पक्षाची इच्छा असल्याचेही स्पष्ट होत आहे.
Join Our WhatsApp Community