Shivsena UBT : शिवसेना उबाठा अस्ताकडे?

138
Uddhav Thackeray म्हणजे ‘मुस्लिमहृदयसम्राट’ असं नेटकरी का म्हणाले?

दीपक कैतके

शिवसेना, (Shiv Sena) एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात अढळ स्थान मिळवणारा पक्ष, आज आपल्या अस्तित्वासाठी झगडताना दिसतो आहे. १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मुंबईत स्थापन केलेल्या शिवसेना या पक्षाने मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि हिंदुत्वाच्या ज्वलंत आवाज या मुद्यावर आधारित आक्रमक राजकारणाद्वारे आपली पाळेमुळे मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पसरवली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) गटात गेल्या काही वर्षांत निर्माण झालेली अंतर्गत फूट, बदलती राजकीय दिशा आणि काही चुकीच्या निर्णयांमुळे पक्षाची अधोगतीकडे वाटचाल होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. (Shivsena UBT )

( हेही वाचा : Punjab मधून २ खलिस्तानवादी दहशतवाद्यांना अटक; आयईडी बॉम्बसह आरडीएक्स जप्त

एकनाथ शिंदे यांनी दिला झटका

शिवसेनेची (Shiv Sena) सर्वात मोठी फूट ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जून २०२२ मध्ये उठाव करून पाडली. शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन करत पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह यावर कायदेशीर लढाई सुरू केली, ज्यामुळे उद्धव ठाकरेंना अभूतपूर्व धक्का बसला. शिंदे गटाने ५६ पैकी ४० हून अधिक आमदार आणि १८ पैकी १३ खासदार आपल्यासोबत घेतले, ज्यामुळे ठाकरे गटाची ताकद एका झटक्यात कमी झाली. कोकणात शिवसेनेचा पाया मजबूत होता, तिथे नारायण राणे यापूर्वीच भाजपात आणि रामदास कदम यांच्यासारखे नेते शिंदेंच्या शिवसेनेत गेले होते. त्यानंतर दीपक केसरकर, किरण सामंत, उदय सामंत यांच्यासारख्या नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाची कोकणातील पकड जवळपास संपुष्टात आली. (Shivsena UBT )

आमदार, खासदार, पक्ष, चिन्ह गेले

मुंबई, जिथे शिवसेनेचा (Shiv Sena) जन्म झाला, तिथेही ठाकरे गटाची अवस्था दयनीय झाली आहे. रवींद्र वायकर, यशवंत जाधव, मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) , दिलीप लांडे यांच्यासारख्या नेत्यांनी शिवसेना (शिंदे) तर काहींनी भाजपाची वाट धरली. मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गटाचे ९० हून अधिक नगरसेवक असताना, २०२२ नंतर ३० पेक्षा अधिक नगरसेवकांनी पक्ष सोडला. यामुळे शिवसेनेचा मुंबईतील दबदबा लक्षणीयरीत्या कमी झाला. मराठवाड्यात तानाजी सावंत, अर्जुन खोतकर, संजय शिरसाठ, पश्चिम महाराष्ट्रात प्रकाश अबिटकर, विदर्भात संजय राठोड आणि उत्तर महाराष्ट्रात गुलाबराव पाटील, किशोर पाटील यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. २०२२ च्या बंडात ठाकरे गटाचे ५६ पैकी ४६ आमदार आणि १८ पैकी १४ खासदार सोडून गेले, ज्यामुळे पक्षाची संघटनात्मक रचना कोलमडली. (Shivsena UBT )

कॉंग्रेसशी युती शिवसैनिकांना खटकली

उद्धव ठाकरेंच्या काही ‘अहंकारी’ निर्णयांनी या संकटाला हातभार लावला. २०१९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करणे हा निर्णय शिवसेनेच्या कट्टर शिवसैनिकांना आणि पारंपरिक मतदारांना खटकला. बाळासाहेब ठाकरेंच्या आक्रमक हिंदुत्वापासून पक्ष दूर गेल्याची भावना निर्माण झाली. काँग्रेससोबत युतीमुळे शिवसेनेचे हिंदुत्व मवाळ झाल्याचा आरोप अनेक नेत्यांनी केला. शिंदे गटाने हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावीपणे हाताळत ठाकरे गटाचे मतदार खेचून घेतले. (Shivsena UBT )

नेत्यांशी थेट संवादाचा अभाव

उद्धव ठाकरेंनी पक्षांतर्गत तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन न देणे, स्थानिक नेत्यांशी थेट संवादाचा अभाव, मर्यादित नेतृत्वगटावर अवलंबून राहणे यामुळे असंतोष वाढला. उद्धव यांच्या नेतृत्वशैलीवर टीका करत अनेकांनी पक्ष सोडला. उदाहरणार्थ, राज ठाकरे यांनी २००५ मध्येच शिवसेना सोडली, तर नारायण राणे यांनी २००५ मध्ये काँग्रेसची वाट धरली होती. गेल्या दशकात गजानन कीर्तीकर, शहाजीबापू पाटील, विजय शिंदे यांच्यासारखे नेतेही पक्ष सोडून गेले. (Shivsena UBT )

इतिहासजमा होण्याचा धोका

उबाठाने लोकसभा निवडणुकीत मुसलमानांच्या मतांसाठी मुसलमानांना चुचकारण्याचा प्रयत्न केला, त्यानुसार त्यांना मुसलमानांची मते मिळाली; पण त्यानंतर विधानसभा निवडणुकीत उबाठाचा दारुण पराभव झाला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले, तर शिंदेंच्या शिवसेनेने ५७, भाजपाने १३२ जागा जिंकत शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांना आकर्षित केले. ठाकरे गटाची कमकुवत संघटनात्मक रचना, तरुण नेतृत्वाचा अभाव, कार्यकर्त्यांमधील नैराश्य यामुळे पक्षासमोर अस्तित्वाचे संकट उभे आहे. जर उद्धव ठाकरेंनी आपली रणनीती, नेतृत्वशैली, पक्षाची दिशा यांचा पुनर्विचार तातडीने केला नाही, तर एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणारी शिवसेना इतिहासजमा होऊ शकते. ठाकरे गटाला आता नव्या जोमाने पुनरुज्जीनाची गरज आहे, अन्यथा हा पक्ष केवळ आठवणींचा भाग बनून राहील.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.