उद्धवा अजब तुझी सेना! आजोबांनी केला होता परप्रांतीयांना विरोध, नातवाचे मात्र लोटांगण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात उद्धव ठाकरे गट सध्या ज्या ज्या भूमिका घेत आहे, त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेच्या अगदी उलट आहेत. हिंदुत्व, काँग्रेसविरोध, अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन न करणे आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी परप्रांतीयांचा विरोध करणे या सर्व मुद्यांवर बाळासाहेबांनी शिवसेनेची विचारधारा ठरवली आणि पक्षाचे राजकारण पुढे नेले. दुर्दैवाने शिवसेनाप्रमुखांचा मुलगा उद्धव ठाकरे यांनी मात्र याच मुद्द्यांना कवटाळून शिवसेनेची वाटचाल पुढे नेणे पसंत केले आहे. कालपर्यंत परप्रांतीयांच्या मुद्द्यावर बाळासाहेबांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर टीकेची झोड उगारली, आज त्याच लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांना भेटायला उद्धव ठाकरे यांचा मुलगा शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे चक्क बिहार गेले.

काँग्रेसशी सलगी केली 

आदित्य ठाकरे बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी बिहार दौऱ्यावर होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांची भेट घेतली. त्यांच्याशी देशाच्या राजकारणावर चर्चा केली. देशात संविधान धोक्यात आले आहे, त्याच्या रक्षणासाठी आपण देशातील विविध राजकीय नेत्यांची भेट घेत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. मात्र यामुळे उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा टीकेचा धनी बनला आहे. २०१९च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी संबंध तोडून थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संबंध जोडून सत्ता स्थापन केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या आयुष्यात काँग्रेसचा राग केला होता, भाजपाचा संग तोडण्याचा विचारही केला नव्हता.

(हेही वाचा कुमारस्वामींचा सत्ता जिहाद! म्हणाले, पुन्हा सत्ता दिल्यास…)

वीर सावरकरांचा अवमान सहन केला 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार प्रमाण मानत होते. त्यांच्या विचाराचा आदर करत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर लागलीच काँग्रेसच्या ‘शिदोरी’ मासिकातून वीर सावरकर यांच्यावर अश्लाघ्य टीका केली होती, त्यावेळी मुख्यमंत्री पदावर असलेले उद्धव ठाकरे यांनी मौन बाळगले होते. याप्रकरणी कारवाई करण्यासाठी वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती, मात्र तेव्हा त्यांना भेटही दिली नव्हती.

मुसलमानांचे लांगुलचालन केले 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रद्रोही मुसलमानांचा कायम द्वेष करत होते, कायम भगव्या रंगाचा सन्मान करत होते. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राज्यात टिपू सुलतानची जयंती साजरी होऊ लागली, शिवसेनेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख झाला, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने उर्दू भाषेत दिनदर्शिका छापली होती. या सर्व बाबींकडे उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष करून त्याला मूकसंमती देत अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन केले.

(हेही वाचा Love Jihad : आता कर्नाटकातील युनूस पाशाची विकृती, हिंदू अल्पवयीन मुलीवर ‘असे’ केले अत्याचार)

परप्रांतीय नेत्यांशी सलगी करणे सुरु केले 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कायम मराठी माणसाच्या हक्कासाठी लढत राहिले. लोकाधिकार समिती स्थापन करून मराठी माणसाला सरकारी नोकऱ्या दिल्या. मराठी माणसासाठी आधी दाक्षिणात्यांच्या विरोधात नंतर उत्तर भारतीयांच्या विरोधात बाळासाहेबांनी भूमिका घेतली, मात्र बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांचा मुलगा, शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे बिहारमध्ये गेले आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांची भेट घेत त्यांच्याशी राजकीयदृष्टीकोनातून संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here