सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्ती सदानंद कदम यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स जारी केले. ईडीने काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे रिसॉर्ट बांधताना पर्यावरण संरक्षण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदानंद कदम आणि अनिल परब यांचे जबाब नोंदवले होते.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी रिसॉर्टच्या बांधकामाशी संबंधित महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायद्यांतर्गत कदम यांच्याविरोधात दुसरा एफआयआर नोंदवला. त्यानंतर ईडीने एफआयआरमध्ये नमूद केलेल्या तपशीलांची तपासणी करण्याचा आणि कदम यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. मे महिन्यात सक्तवसुली संचालनालयाने परब आणि कदम यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. ईडीने आता सदानंद कदम यांना समन्स पाठवत पुढील आठवड्यात चौकशीसाठी पाचारण केले आहे. अनिल परब यांनी दापोलीतील रिसॉर्ट स्वस्त दरात कदम यांना विकला. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात गैर व्यवहार झाला, असा संशय ईडीला आहे. त्यामुळे या प्रकरणातील चौकशीत नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, दापोली कोर्टाने साई रिसॉर्ट घोटाळ्यासंदर्भात अनिल परबांना समन्स बजावले आहे आणि १४ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
(हेही वाचा गांधी हत्येचे धागेदोरे काँग्रेसपर्यंत पोहचतात! रणजित सावरकरांचा ‘एबीपी माझा कट्ट्या’वरून खळबळजनक आरोप)
Join Our WhatsApp Community