शिवसेनेचे हिंदुत्त्व हे प्रामुख्याने जातिभेदविरहीत राहिले आहे. याऊलट संभाजी ब्रिगेडचा पाया जातीद्वेषावर उभा आहे. त्यामुळे नव्या युतीमागचा नेमका उद्देश काय, यातून त्यांना कुठला वर्ग मतदार म्हणून अपेक्षित आहे, हे मूळ शिवसैनिकांना पडलेले कोडे आहे. ‘ब्रिगेड’शी संग केल्यामुळे शिवसेनेला बळ मिळण्याऐवजी जातीभेदविरहीत हिंदुत्त्वात येईल अडथळा, असे स्पष्ट मत इतिहास अभ्यासक चंद्रशेखर साने यांनी व्यक्त केले.
( हेही वाचा : हिंदुत्ववादी ते हिंदुत्वद्वेष्टे; हा उलटा प्रवास कसा केलात उद्धव ठाकरे? )
शिवसेना-संभाजी ब्रिगेड यांच्या युतीविषयी बोलताना साने म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे समर्थ रामदासांना खूप मानायचे. त्याच्या विपरित ब्रिगेडची भूमिका आहे. समर्थ रामदासांविषयी अत्यंत घृणास्पद विचार, खालच्या शब्दांत प्रचार, आदिलशाहीचे नोकर असे आरोप ते करतात. प्रबोधनकारांच्या वाटेने चालणारे उद्धव ठाकरे याकडे कसे पाहतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बाबासाहेब पुरंदरे आणि शिवसेनेचे नाते अतिशय जिव्हाळ्याचे. मात्र, संभाजी ब्रिगेडने बाबासाहेबांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कारनाम्यांची सुरुवात झाली जेम्स लेन प्रकरणापासून. लेनला विरोध करणारी पत्रे बाबासाहेबांनी पाठवली, तरीही ब्रिगेडने त्यांना या प्रकरणात गोवले. प्रत्यक्षात तसे काही नव्हते, हे सारी जनता जाणते. भांडारकर इन्सिट्यूटचा शिवशाहीच्या इतिहासाशी काही संबंध नव्हता. तरीही ब्रिगेडच्या ७० हून अधिक लोकांनी या इन्सिट्यूटवर हल्ला केला. संत रामदासांची बदनामी, राम गणेश गडकरी पुतळा, दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यासंदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका ही हिंदुत्त्वविरोधी आहे. असे असतानाही शिवसेनेने त्यांच्याशी यूती करणे न पटणारे आहे, असेही साने म्हणाले.
कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारी भूमिका
मतदार या नव्या युतीला कितपत स्वीकारतील, याविषयी साशंकता आहे. मागच्या निवडणुकीत ५०० मते मिळवताना ब्रिगेडची दमछाक झाली होती. त्यामुळे प्रतिमा बदलण्यासाठी केलेला प्रयोग अंगाशी येण्याची शक्यताच अधिक आहे. बाळासाहेबांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली, पण संभाजी ब्रिगेड तारखेनुसार शिवजयंती करते. हे शिवसेनेला किती रुचणार आहे, ज्वलंत हिंदुत्त्वाचा भगवा ध्वज कायम खांद्यावर घेणारे शिवसैनिक त्यांना जवळ करतील का, हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर जी शिवसेना उरली आहे, तिची दिशा पूर्णतः बदलल्याचे हे द्योतक आहे. याऊलट कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारी ही भूमिका असून, उद्धव ठाकरे यांना यातून कुठला वर्ग मतदार म्हणून अपेक्षित आहे, हेही एक कोडेच आहे, असेही साने म्हणाले.
Join Our WhatsApp Community