राज ठाकरेंवर आता शिवसेनेचे ‘बाळासाहेब अस्त्र’

156

सध्या मशिदींवरील भोंगे काढण्यावरून उफाळून आलेल्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच चार्ज होत असून हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब म्हणून पाहिलं जातं आहे. राज ठाकरे यांना भोंग्याच्या मुद्द्यावरून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे राज्यातील सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे चित्त थाऱ्यावर राहिले नसून त्यांच्यावर थेट हल्ला न करता आता शिवसेनेने ‘बाळासाहेब अस्त्र’ चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा समाचार घेतल्या गेलेल्या बाळासाहेबांच्या जुन्या भाषणाच्या क्लिप आता सोशल मीडियावरून शिवसेनेकडून व्हायरल केल्या जात आहे. यासाठी शिवसेनेने आपल्या सोशल मीडिया सेलला कामाला जुंपले आहे.

…म्हणून बाळासाहेबांचे अस्त्र बाहेर काढण्यात आले

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मार्चचा अलटीमेंटम दिल्यानंतर, अनेक मशिदींवर भोंग्याविना अजान करण्यात आली. तर ज्याठिकाणी भोंग्यावरून अजान ऐकवण्यात आली, त्या ठिकाणी मनसैनिकांनी हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केला. परंतु मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिल्यानंतर मुंबईसह राज्यातील अनेक भागांमधील भोंगे खाली उतरले तर काहींनी ते बंद करून ठेवले. त्यामुळे संपलेल्या मनसेला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र, हिंदुत्वाच्या मुद्दयावरून आक्रमक झालेल्या राज ठाकरेंना रोखण्यात आता शिवसेनेला अपयश येत असून, त्यांच्या विरोधात बोलणारा कोणताही नेता नसल्याने आता शिवसेनेने बाळासाहेबांचे अस्त्रच बाहेर काढले आहे.

व्हिडीओ क्लीप्स केल्या जाताहेत व्हायरल  

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापन केल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांची नेतृत्वाच्या मुद्दयावरून तसेच स्वत:ची नक्कल करण्यावरून जो काही समाचार विविध सभांमध्ये घेतला होता, त्या सभांमधील भाषणांचे क्लिप्स आता शिवसेनेकडून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. राज ठाकरे यांना प्रति बाळासाहेब म्हणून संबोधले जात असल्याने शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातून काही व्हिडीओ व्हायरल करण्यात येत असून मनसे सोबत भाजपच्या विरोधातील भाषणांच्याही क्लिप्स व्हायरल करायला सुरुवात केल्या आहेत.

( हेही वाचा: मी पळालेलो नाही, खोटे गुन्हे दाखल करू नका! काय म्हणाले संदीप देशपांडे? पहा व्हिडिओ )

भाजपच्या समाचार घेण्यात आलेल्या व्हिडीओतील भाषणाचा संवाद :

आम्हाला वाटलं ही कमळाबाई उपयोगी पडेल, संसार उभा राहिल, आम्ही सोफा घेतला, आम्ही गादी विकत , पाळणा घेतला विकत, पण सकाळी उठून पाहतो तर ही कमळा,भाजपची! खिडकी उघडून शरद पवारला डोळा मारतेय!

व्हिडीओ दोन : ‘राज’च्या नेतृत्वावर टिका

हे आमच्या पुतण्याने झक मारली, काय त्याच्या डोक्यात शिरलं काही कळत नाही. नेतृत्व! हे आहे ना दिसतं ते पाहिजे. काल मैदान कसं भरलं होतं हो! एवढं झालं होतं का? हे हा फोटो नाही येणार वृत्तपत्रात. हे दाखवा हे दश्य… हे शिवस्वरूप. हे शिवाचे रूप आहे. याला महत्व आहे.

व्हिडीओ तीन : राज यांच्या नकलेवर टिका

पूर्वी मी ज्या स्टाईलमध्ये बोलत होतो. ही माझी स्टाईल कुणी तरी उचलली म्हणतात,  मला माहित नाही! म्हणजे मी माझ्या स्टाईलमध्ये बोललो तर मी त्यांची कॉपी करतो असे म्हणता तुम्ही. एक विनोद आठवतो, परीक्षा चालू असताना एका मुलाने कोरा पेपर दिला. दुसऱ्याने ते पाहिलं आणि त्याने सरांना सांगितले, सर त्याने कोरा पेपर दिला. त्यावर सर म्हणतात, तुला काय झालं, त्यावर तो म्हणाला , मी पण कोरा पेपर दिला. नाहीतर तुम्ही माझ्यावरच आरोप कराल की तू त्याची कॉपी केलीस म्हणून. काय म्हणून स्टाईल मारतो, स्टाईल ठिक आहे हो, विचार महत्वाचे आहेत, काय वाचन वगेरे आहे का तुमचं. मराठी.. मराठी.. मराठी… साल्यांनो तुमचा जन्म झाला नव्हता, तेव्हा मी मराठीचा मुद्दा मांडला होता, ही जनता साक्ष आहे(जनसमुदायाकडे बोट दाखवून).. सगळी वाट लावली वाट… जाऊदे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.