‘अमरावती बंद’ ला शिवसेनेचाही होता पाठिंबा?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र हातात घेऊन शिवसैनिक बंदमध्ये सहभागी होते.

रझा अकादमीने राज्यभर केलेल्या जातीय दंगलीचा निषेध म्हणून हिंदू संघटनांनी उत्स्फूर्तपणे ‘अमरावती बंद’ पुकारला होता. त्या बंदला भाजपाचा पाठिंबा होताच, परंतु सत्ताधारी शिवसेना पक्षाचाही पाठिंबा होता, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिल्याने खळबळ उडाली आहे.

सेनेच्या सहभागावरून चर्चेला उधाण

‘अमरावती बंद’ ला संध्याकाळी काहीसे हिंसक वळण आले होते. त्याठिकाणी जमावाकडून काही प्रमाणात तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी बंदच्या आदल्यादिवशी दंगल करणाऱ्या मुसलमानांसह दुसऱ्या दिवशी बंद करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर कारवाई सुरु केली आहे. सोमवारी अमरावती पोलिसांनी भाजपाचे माजी मंत्री अनिल बोंडे यांना अटक केली, तसेच लगेचच त्यांची सुटकाही केली. दुसरीकडे एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अमरावती येथे बंदमध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी भाजपने मुंबईहून अमरावतीला पैसे पाठवले होते, असा आरोप केला. अशा सर्व परिस्थितीत या बंदला खुद्द सत्ताधारी पक्ष शिवसेनेचा स्थानिक पातळीवर पाठिंबा होता, अशी माहिती समोर आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेनेच्या जिल्हास्तरीय नेत्यांचा सहभाग! 

या बंदमध्ये १५-२० शिवसैनिकांचा गट हा उत्स्फूर्तपणे सहभागी झाला होता. त्यांनी त्यावेळी हातामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र घेतले होते. यामध्ये शिवसेनेचे अमरावती शहर प्रमुख पराग गुडाधे, जिल्हाध्यक्ष राजेश वानखेडे आणि अमरावतीतील नगरसेवक प्रशांत वानखेडे हेही सहभागी होते. याला नगरसेवक वानखेडे यांनी दुजोरा दिला. या बंदमध्ये शिवसैनिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, त्यामध्ये पक्षाचा संबंध नव्हता, असेही वानखेडे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here