नावाला अर्थसंकल्पीय अधिवेशन, लक्ष्य मात्र शिवसेनेला बदनाम करण्याचे!

हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होते की, हा शिवसेनेला बदनाम करण्याचा विरोधकांचा संकल्प होता, असा प्रश्न या निमित्ताने पडतो. त्यामुळे या संपूर्ण अधिवेशनात फक्त आणि फक्त शिवसेना कशी टार्गेटवर राहिली याचा घेतलेला हा आढावा.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 10 मार्चला संपले. या अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच हे अधिवेशन गाजणार याची शक्यता वर्तवली जात होती. अधिवेशनाआधीच पूजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्महत्येमुळे आणि यात शिवसेनेच्या संजय राठोड यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे, हे अधिवेशन शिवसेनेला कोंडीत पकडणारे असणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे अधिवेशनाआधीपासूनच शिवसेनेला टार्गेट करण्याचा विरोधकांचा हा संकल्प अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी पूर्णत्वास नेला, अशीच चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होते की, हा शिवसेनेला बदनाम करण्याचा विरोधकांचा संकल्प होता, असा प्रश्न या निमित्ताने पडतो. त्यामुळे या संपूर्ण अधिवेशनात फक्त आणि फक्त शिवसेना कशी टार्गेटवर राहिली याचा घेतलेला हा आढावा.

संजय राठोड प्रकरण

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावरच पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येमुळे राजकीय वातावरण तापले होते. शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड हे विरोधकांच्या रडारवर होते. अखेर अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे न सोपवल्याने थेट मुख्यमंत्र्यांवर विरोधकांनी टीका केली. शिवसेनेचे मंत्री कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडवत आहेत, असा विरोधकांनी आरोप केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही कोरोनाच्या नियमांना बगल देत संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे गर्दी जमवली. त्यामुळे मुख्यमंत्री नेमके काय करत आहेत? असा सवाल यावेळी विरोधकांनी अधिवेशनात उपस्थित केला. याच मुद्द्यावर वेळोवेळी विधान भवनाच्या पायर्‍यांवर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विरोधकांनी घोषणाबाजी केली. संजय राठोड यांचा राजीनामा जरी घेतला असला तरी तो घ्यायला मुख्यमंत्र्यांना चौदा दिवसांचा वेळ का लागला, हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. यासोबतच राजीनामा घेतल्यानंतर तो राज्यपालांकडे पाठवायला तीन दिवस का लागले? मुख्यमंत्री संजय राठोड यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न विरोधकांनी यावेळी उपस्थित केले. अखेर मुख्यमंत्र्यांना संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवावा लागला.

(हेही वाचाः ठाकरेंचे सरकार असूनही कलिनातील सांस्कृतिक भवनला शिवसेनाप्रमुखांचे नाव मिळेना!)

ऐन अधिवेशनात मनसुख हिरेन हत्याप्रकरण बसले मानगुटीवर

आधीच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ठाकरे सरकारला सभागृहात टार्गेट करत असताना, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर अधिवेशनात सुरक्षेचा मुद्दाही चांगलाच तापणार, हे जवळजवळ नक्की झाले होते. मात्र, या प्रकरणात स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यामागे पोलिस अधिकारी सचिन वाझे असल्याचा आरोप थेट देवेंद्र फडणवीस यांनी केला.  सचिन वाझे यांनी 2008 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री सचिन वाझे यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. सचिन वाझे यांचे सी.डी.आर. बघता मनसुख हिरेन यांच्या हत्येमागे त्यांचा हात असल्याचा संशय फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यामुळे सचिन वाझे यांना कलम-201 खाली अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. मात्र चौकशी आधी कोणाला फाशी देता येणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे या मुद्द्यावर देखील विरोधक यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. याच मुद्यावरुन एकाच दिवशी जवळपास नऊ वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना क्राईम ब्रँचमधून हटवण्याचा निर्णय घेतला.

(हेही वाचाः बदलीत सुद्धा गोंधळाचे वातावरण!)

औरंगाबादवरुनही सेना टार्गेट

औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावे, ही बाळासाहेब ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांचे चिरंजीव राज्याचे मुख्यमंत्री असताना देखील ती इच्छा पूर्ण होत नाही, असा टोला विरोधकांकडून थेट मुख्यमंत्र्यांना लावण्यात आला. औरंगाबादचे नामकरण करुन शहराला संभाजीनगर नाव कधी देणार, असा थेट सवाल विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता.

कोविड साहित्यात भ्रष्टाचार

गेले वर्षभर राज्यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव असल्याने त्यासाठी खास तरतुदी आणि निधी राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मात्र कोविड संदर्भाच्या उपाययोजना करत असताना, राज्य सरकार तसेच महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केला. कोविड सेंटर उभारताना कोणत्याही निविदा मागवण्यात आल्या नाहीत. कोविड सेंटरमध्ये लागणारे साहित्य घेताना शिवसेनेच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला.

(हेही वाचाः अधिवेशनात सिनिअरपुढे ज्युनिअर आमदारांना ‘बोलता’ येईना!)

नितेश राणेंनी सभागृहात काढले शिवसेनेचे वाभाडे

कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा करत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले. अभिनेता दिनो मोरिया हा सरकारमधील कोणतेही काम करुन देत असल्याचे सांगतो. हा कुणाचा मित्र आहे, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. तसेच मुंबईत सध्या नाईटलाईफ गॅंग तयार होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. जम्बो कोविड सेंटर ज्यांनी बांधले ते नेमके कुणाच्या आशीर्वादाने? एवढेच नाही तर रिझवी कॉलेजच्या बाजूला एक बंगला आहे, तिथे अधिकारी आणि मंत्री का जातात, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. या सरकारला 5 आणि 8 हे दोन आकडे माहीत आहेत. आता पाच आकडा याचा अर्थ पाच महिने की, पाच टक्के याचे उत्तर द्यायला हवे असे देखील नितेश राणे म्हणाले होते. तसेच दिशा सालीयन आत्महत्येवरुन देखील नितेश राणे यांनी शिवसेनेला टार्गेट केले.

शिवसेनेचे आमदार चिडीचूप, जाधवांनी लढवली खिंड

एकीकडे विविध मुद्यावरुन विरोधक शिवसेनेला सभागृहात टार्गेट करत असताना दुसरीकडे मात्र शिवसेनेचे आमदार सभागृहात पक्षाची बदनामी होत असताना देखील मूग गिळून गप्प होते. मात्र शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देत सत्ताधारी पक्षाकडून एकट्याने खिंड लढवली. सचिन वाझे प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांचे थेट नाव विरोधकांकडून घेतले जात असल्याचे पाहिल्यानंतर, भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केले. अन्वय नाईक प्रकरणाची चौकशी अधिकारी सचिन वाझे करत असल्यामुळे, ते सत्ताधारी पक्षाला टार्गेट करत असल्याचा जाधव यांनी आरोप करुन सभागृहात गोंधळ घातला. मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात तपास व्हायला पाहिजे, अशी मागणी विरोधक करत आहेत. मात्र, तिथेच भाजपचे खासदार मोहन डेलकर यांच्याही आत्महत्येचा तपास व्हायला पाहिजे. मोहन डेलकर यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपचे दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल खेडा पटेल तसेच काही अधिकाऱ्यांची नावे आहेत, हा मुद्दा देखील भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.

(हेही वाचाः आमदार फुटण्याच्या भीतीने विधानसभा अध्यक्ष निवडणूक टाळली! काँग्रेस नाराज, महाआघाडीत बिघाडी!!)

शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांनीच दिला घरचा आहेर

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते आणि रामदास कदम यांनी विधान परिषदेत शिवसेनेला घरचा आहेर दिला. दिवाकर रावते यांनी मराठीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी तसेच मुख्यमंत्री यांना धारेवर धरले होते. सभागृह कामकाजात इंग्रजी शब्दांच्या केल्या जाणाऱ्या वापराला दिवाकर रावते यांच्याकडून जोरदार विरोध झाला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेक कानपिचक्या दिल्या. मराठी भाषा आणि मराठी विद्यापीठ मुद्द्यावर रावतेंनी सरकारला धारेवर धरत स्वपक्ष शिवसेनेलाही घरचा आहेर दिला. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे होत असल्याचे नमूद करत, ते विधानपरिषदेत चांगलेच भडकले. तसेच मराठीच्या मुद्द्यावर बाळासाहेबांना काय उत्तर देऊ, असा थेट सवाल त्यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. तर रामदास कदम यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करुन, नाराजी समोर आणली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here